Fri, May 29, 2020 08:20होमपेज › Nashik › पुणे - सातारा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत २ ठार 

पुणे - सातारा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत २ ठार 

Published On: Aug 08 2019 5:13PM | Last Updated: Aug 08 2019 5:13PM
पिंपळगाव बसवंत : वार्ताहर

बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन अभियंत्यांचा मृत्यू झाल्याची घटना पुणे - सातारा रोडवर घडली. मृतांमध्ये पिंपळगाव बसवंत येथील युवकाचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव येथील मनसेचे निफाड तालुकाध्यक्ष प्रकाश गोसावी यांचे चिरंजीव विपुल गोसावी व त्याचा मित्र (नाव समजले नाही) या दोघांनी पुण्यातून बीईची पदवी घेतली होती. त्यांना नुकतीच एका कंपनीत नोकरीही लागली होती. बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कंपनीतून काम आटोपून घरी परतताना त्यांच्या दुचाकीला सातारा रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरात होती की, विपुलच्या पाठीमागे बसलेल्या मित्राच्या मृतदेहाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. विपुल हा प्रकाश गोसावी यांचा एकुलता एक मुलगा आहे. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 

आई-वडिलांनी पुरवला बुलेटचा हट्ट

विपुल हा  एकुलता एक असल्याने आई-वडील व घरातील इतर सदस्यांचा अत्यंत लाडका होता. अभ्यासातही तो हुशार होता. त्यामुळे पुण्यातील उच्चभ्रू इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याने बी.ई.ची पदवी घेतली होती. विपुल लाडका असल्याने त्याचे सर्व हट्ट आई-वडील पूर्ण करीत असे. इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असतानाच त्याने वडिलांकडे बुलेटची मागणी केली होती. वडिलांनीही लाडक्या विपुलचा हट्ट पूर्ण केला. त्याला नवीकोरी बुलेट घेऊन दिली. अशातच विपुलला पुण्यातील एका कंपनीत जॉबसुद्धा मिळाला होता. वर्ष-दोन वर्षापासून बुलेटसोबत त्याच्या आयुष्याचा प्रवास मजेत चालला होता. पुण्यातील रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याने जीएस पदही भूषविले होते. सर्व आलबेल असताना बुधवारची रात्र विपुलसाठी काळरात्र ठरली.