Wed, Jun 03, 2020 20:11होमपेज › Nashik › जळगाव : मातीचे घर पडून दोन मुलांचा मृत्‍यू 

जळगाव : मातीचे घर पडून दोन मुलांचा मृत्‍यू 

Published On: Aug 01 2019 7:09PM | Last Updated: Aug 01 2019 7:09PM
 जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव जिल्‍ह्‍यात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. दरम्‍यान आज (गुरूवार) अमळनेर तालुक्‍यातील बाम्‍हणे येथे मातीचे घर शेजारील पत्र्याच्या शेडवर पडले. यामध्ये ढिगार्‍याखाली दबून घरातील दोन मुलांचा मृत्‍यू झाला. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. गुरूवारी दि. १ च्या मध्यरात्री पाऊस सुरूच होता. अमळनेर तालुक्यातील बाम्हणे येथे  पुना सदा पावरा  हा आपल्या परिवारासह  पत्र्याच्या शेड मध्ये पत्नी, दोन मुले यांच्यासह राहत होता. नेहमी प्रमाणे पावरा कुटुंब झोपले होते. त्यांच्या पत्र्याच्या घरा शेजारी ज्ञानेश्वर पाटील यांच्या मालकीचे मातीचे घर आहे. पाटील यांचे मातीचे घर सततच्या पावसाने भीजून दि.1 च्या मध्यरात्री पावरा यांच्या पत्र्याच्या शेडच्या घरावर कोसळले.

या भींतींच्या ठिगऱ्याखाली पुना सदा पावरा, पत्नी शांताबाई पावरा तसेच मुले जितेश पावरा (वय 7) व राहुल पावरा (4) हे  दाबले गेले. गावकऱ्यांनी आरडाओरड ऐकू आल्यानंतर धर्मराज पाटील, महेश पाटील, राजेंद्र पाटील, सरपंच प्रवीण पाटील, नितीन पाटील, संतोष पाटील, गुणवंत पाटील, प्रतीक पाटील , प्रकाश पाटील , नवल पाटील , किशोर पाटील यांनी त्यांना बाहेर काढायला सुरुवात केली.
नागरिकांनी या घराच्या मातीचे ढीगारा बाजूला करायला सुरूवात केली. यामध्ये आई आणि वडीलांना सुखरूप काढण्यात लोकांना यश आले मात्र,  जितेश पावरा (वय 7) व राहुल पावरा (4)  या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला.

जखमींना उपचारासाठी बेटावद येथील ग्रामीण रूग्‍णालयात नेण्यात आले होते. मात्र या ठिकाणी सुविधा नसल्‍याने त्‍यांना अमळणेर येथे ग्रामीण रूग्‍णालयात नेण्यात आले, तर दोन मुलांच्या शवविच्छेदनासाठी त्‍यांना  अमळणेर येथे नेण्यात आले. मारवाड पोलिस स्‍टेशनमध्ये या घटनेची आकस्‍मीक मृत्‍यू म्‍हणून नोंद करण्यात आली आहे.