Sun, Jan 19, 2020 15:20होमपेज › Nashik › गोदाकाठातून वर्षभरात बारा मुली बेपत्ता!

गोदाकाठातून वर्षभरात बारा मुली बेपत्ता!

Published On: Jan 02 2018 1:12AM | Last Updated: Jan 01 2018 11:50PM

बुकमार्क करा
सायखेडा : दीपक पाटील

निफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागातील सायखेडा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या तीस ते पस्तीस गावांतील डझनभर मुली जानेवारी  ते डिसेंबर 2017  या वर्षभरात बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. त्यात बहुतेक शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थिनी असल्याने पालक हतबल झाले आहेत.

21व्या शतकाकडे पदार्पण करत असताना साहजिकच बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला. परिणामी प्रत्येकाच्या हाती मोबाइल आला अन् अतिरेक झाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण मुले-मुली पसार होण्यामागे महत्त्वाची भूमिका मोबाइलने बजावली आहे. हे पोलिसांच्या तपासात अनेकदा पुढे आले आहे. 

अनेक वेळा मैत्री होते. मुले-मुली एकमेकांचे मोबाइल क्रमांक घेत, सोशल मीडिया, मेसेज आदींद्वारे संपर्क वाढवत पळून जाण्याची योजना आखली जाते. अशा अनेक घटना ताज्या आहेत. एक दोन भेटीतच घरातून पळून जाण्याची व विवाह करून किंवा प्रेमसंबंधातून जीवन संपवून टाकण्याच्या घटना घडत आहेत. बहुतेक तरुण मुली घरातून पोबारा करत असल्याने मुलीच्या आई-वडिलांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यातून काही पालकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. 

काय घ्यावी काळजी

1. मुले-मुली एकांतामध्ये फोनवरून जेव्हा बोलत असतात त्यावेळी ते कोणाशी आणि काय बोलत असतात याची चौकशी पालकांनी करावी.
2. मी मैत्रणी/नातेवाइकाकडे चालली आहे, असे मुली पालकाना सांगून घरातून जातात, परत येत नाहीत. अशा वेळी मुलीला एकटी न पाठवता इतर नातेवाइकासोबत पाठवावे.
3. मुलगी/मुलगा घरातून शाळा कॉलेजला जातात त्यावेळी ते घरातून किती वाजता निघाले? शाळा-कॉलेजमध्येच गेले का? किती वाजता पोहचले? तासिकेला बसले का ? शाळा-कॉलेजमधून बाहेर कधी पडले? सरळ घरी आले का? किती वाजता आले? याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
4. बहुतांश मुला-मुलींनी निघून जाण्याअगोदर मोबाइल फोनचाच वापर/आधार घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुला-मुलींचा मोबाइल अधूनमधून तपासावे.
5. धावपळीच्या दुनियेत पालकांना कुटुंब चालवण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो. त्यामुळे पाल्याकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नसल्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
6. घटना घडल्यानंतर माता-पित्यांनी अश्रू ढाळण्यापेक्षा त्या आधीच काळजी घ्यावी.