Sat, May 30, 2020 00:45होमपेज › Nashik › कुसुमाग्रजांच्या गावाचा कायापालट!

कुसुमाग्रजांच्या गावाचा कायापालट!

Last Updated: Feb 26 2020 10:26PM
नाशिक : रावसाहेब उगले

‘नटसम्राट’सारखी अजरामर नाटके, ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’, ‘कणा’ यांसारख्या एकाहून एक सरस कविता व अन्य साहित्य लिहून मराठी साहित्यात अढळ स्थान निमार्र्ण करणार्‍या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन (27 फेब्रुवारी) जागतिक मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी हे कुसुमाग्रजांचे जन्मगाव. विकासकामांमुळे सध्या या गावाचा कायापालट होत असून, कुसुमाग्रज स्मारकासह अन्य कोट्यवधींची कामे सुरू आहेत. पर्यटनस्थळाचा दर्जा लाभल्याने या गावाच्या वैभवात भर पडली आहे. 

मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हे गाव शेतीसंपन्न आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वीच स्वागतकमान सर्वांचे लक्ष वेधते. चकाचक रस्त्यांमुळे गावाच्या सौंदर्यात भर पडते. काहीसे पुढे जाताच कुसुमाग्रज स्मारकाची इमारत लक्ष वेधून घेते. सुमारे 70 लाखांच्या निधीतून या स्मारकाचे काम सुरू आहे. वॉल कंपाउंड, स्वागतकमान, अंतर्गत रस्ते, वाचनालय या बाबींचाही कामात समावेश आहे. येत्या दोन महिन्यांत स्मारकाचे काम पूर्ण होणार असून, लॉन, ग्रीन जिम, पेव्हरब्लॉक आदी कामे केली जाणार आहेत.

सन 2017 मध्ये राज्याचे तत्कालीन पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांच्या हस्ते या कामाचा श्रीगणेशा झाला. ना. रावल यांनी या गावाला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यामुळे विकासाला दिशा मिळाली. पर्यटस्थळ विकासासाठी गावाला एक कोटी 78 लाखांचा निधी मंजूर झाला असून, पाणीयोजनेसाठी एक कोटी आठ लाख रुपये मंजूर आहेत.

या गावाची लोकसंख्या 4,500 इतकी आहे. गावात तीन पाणीवापर संस्था, एक पतसंस्था, पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची आठवी ते दहावी माध्यमिक शाळा आणि अकरावी ते बारावी कनिष्ठ महाविद्यालयही असून, तेथे पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. सन 2011 मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी जिल्हा परिषद शाळेला 56 लाखांचा निधी मंजूर केला. त्या निधीतून 10 वर्गखोल्या बांधण्यात आल्या आहेत.

कुसुमाग्रजांच्या पत्राने कालव्याला मंजुरी!

सन 1981 मध्ये ओझरखेड धरणाच्या पाण्यासाठी शिरवाडे वणी गावाच्या शिवारातून ग्रामस्थांना कालवा बांधण्याची इच्छा होती. मात्र, त्याला मंजुरी मिळत नव्हती. ही बाब कुसुमाग्रजांना समजताच त्यांनी आपल्या हस्ताक्षरातून तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक खोत यांना पत्र पाठविले. कुसुमाग्रजांचे पत्र पाहताच खोत यांनी तातडीने कालव्याच्या कामाला मंजुरी दिली. एवढेच नव्हे, तर जिल्हाधिकारी खोत यांनी ‘ही तर कुसुमाग्रजांच्या सेवेची संधी’ असे म्हणत त्यांचे पत्र फ्रेम करून आपल्या कार्यालयात लावले होते!