Wed, Jun 03, 2020 09:33होमपेज › Nashik › पौगंडावस्थेतील मुलांना खुणावतेय तंबाखू

पौगंडावस्थेतील मुलांना खुणावतेय तंबाखू

Published On: May 31 2018 1:43AM | Last Updated: May 30 2018 10:32PMनाशिक : गौरव अहिरे

महाराष्ट्रातील 15 ते 18 वयोगटातील तरुण वर्ग सर्वाधिक  तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी जात असल्याचा धक्‍कादायक अहवाल समोर आला आहे. त्यातच तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांकडून अल्पवयीन तरुणांना सर्रासपणे विक्री केली जात असल्याने व्यसनाधीन तरुणांचे प्रमाण गत वर्षीच्या तुलनेने दुपटीने वाढले आहे. दरम्यान, राज्यात कोटपा कायद्यानुसार सर्वाधिक कारवाई नाशिक शहर पोलिसांनी केली असून, गत तीन महिन्यांत 661 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्वे (गेट्स-2) च्या अहवालानुसार महाराष्ट्रात 6 टक्के पुरुष तर 1.4 टक्के महिला आणि 3.8 टक्के युवक धूम्रपान करत आहेत. त्याचप्रमाणे 31.7 टक्के पुरुष, 16.6 टक्के महिला आणि 26.6 टक्के युवक हे धूम्रपान रहित तंबाखूचा वापर करतात. त्यानुसार महाराष्ट्रात एकूण 35.5 टक्के पुरुष, 17 टक्के     महिला आणि 26.6 टक्के युवक हे  तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. ग्रामीण भागात हे प्रमाण 29.9 टक्के आणि शहरी भागात 22.9 टक्के आहे. गेट्सच्या अहवालात धूम्रपान करणार्‍यांचे प्रमाण 3.2 टक्यावरून 2.8 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. मात्र तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण हे 15-18 वयोगटातील तरुणांची संख्या 2.9 टक्के वरून 5.5 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. खैनी तंबाखू आणि गुटखा खाणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात 15.5 टक्के युवावर्ग खैनी तर 8.6 टक्के गुटखा सेवन करत असल्याचा निष्कर्ष गेट्सच्या अहवालातून समोर आले आहेत. नाशिकमध्ये देखील पौंगडावस्थेतील तरुणाई तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेली आहे. विक्रेते देखील नियम पायदळी तुडवून अल्पवयीन वर्गास सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करीत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.  

तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांना सिगारेटचे पाकिट विक्री करता येते, ते किरकोळ सिगारेट विक्री करू शकत नसतात. तरीदेखील विक्रेते 1, 2 सिगारेट विक्री करीत असल्याने धुम्रपान करण्यांचे प्रमाण वाढले आहे. पाकिटावरील धोक्याचा इशारा पाहून अनेकांनी धुम्रपान कमी केल्याचा तसेच धुम्रपान सोडल्याचीही उदाहरणे आहेत. मात्र विक्रेते किरकोळ सिगारेट विक्रीवरच धन्यता मानत आहे. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालयाजवळील परिसरात, हॉटेल, तरुणाईचा वावर असणार्‍या ठिकाणी, बस-रेल्वेस्थानकांजवळ चुप्या पद्धतीने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे चित्र आहे.

शहरात सर्वाधिक कारवाई 

सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात आणि व्यापार विनिमय, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण प्रतिबंध कायदा) अधिनियम 2003 हा केंद्र सरकरचा कायदा असून त्यास कोटपा कायदाही म्हटले जाते. महाराष्ट्रात नाशिक, अमरावती, वाशिम, बीड, सोलापूर, रायगड, पालघर, नवी मुंबई अशा आठ जिल्ह्यात कोटपा कायद्यानुसार कारवाई सुरु आहे. मात्र त्यात सर्वाधिक कारवाई नाशिक शहर पोलिसांनी केली असून 661 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून लाखो रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थही पोलिसांनी जप्‍त केले आहेत. त्याचप्रमाणे वाशिम पोलिसांनी 98, सोलापूर पोलिसांनी 75, अमरावती 27 आणि बीड पोलिसांनी 35 लोकांविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. 

मौखिक तपासणीत चार कर्करुग्ण आढळले

राज्यभरात आरोग्य विभागामार्फत डिसेंबर ते जानेवारी महिन्यात 30 वर्षांवरील सर्वसामान्य नागरिकांची मौखिक तपासणी करण्यात आली. त्यात नाशिक जिल्ह्यातील 25 लाख 81 हजार 823 नागरिकांची तपासणी केली. त्यातील 26 हजार 511 नागरिकांच्या मुखात चट्टे आढळून आले. त्यातील तज्ञ डॉक्टरांमार्फत 19 हजार 288 लोकांची तपासणी झाली असून उर्वरीत लोकांची तपासणी सुरु आहे. त्याचप्रमाणे 469 लोकांना बायप्सी करण्याचा सल्ला तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. त्यातील 35 लोकांची तपासणी पूर्ण झाली असून त्यापैकी 4 जणांना कर्करोगाची लक्षणे आढळून आली आहे.  तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाणे धोक्याचे आहे. पौंगडावस्थेतील तरुणाई जाहिराती, चित्रपटातील दृष्य पाहून तंबाखूजन्य पदार्थांकडे आकर्षित होत आहे. मात्र या व्यसनांमुळे कर्करोग होण्याचाही धोका आहे, हे सर्वांनी ओळखले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने व्यसन टाळावे, तसेच प्रत्येकाने वेळोवेळी मौखिक तपासणी करून आरोग्याची काळजी घ्यावी, असे दंत शल्यचिकित्सक डॉ. दिनेश ढोले यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरात 2016 ते 2017  या कालावधीत 188 कारवाया करून 4.21 कोटी रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्‍त केले आहेत. त्याचप्रमाणे 2017-2018 मध्ये 174 कारवाया करून 4.18 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. तर 2017 -2018 या कालावधीत शहर वगळून नाशिक जिल्ह्यात 72 कारवाया करून 1.43 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे.