Tue, Nov 19, 2019 04:01होमपेज › Nashik › छेडछाडीवरून नंदुरबार रेल्वे स्थानकात तुफानी दगडफेक

छेडछाडीवरून नंदुरबार रेल्वे स्थानकात तुफानी दगडफेक

Published On: Aug 26 2019 2:50PM | Last Updated: Aug 26 2019 2:58PM

संग्रहित छायाचित्रनंदुरबार : प्रतिनिधी 

रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची छेड काढल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत शेकडो जणांच्या जमावाने नंदुरबार रेल्वे स्थानकावर धुडगूस घालत मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. अखेरीस अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला नियंत्रित करण्यात पोलिसांना यश आले. ही घटना काल, रविवारी (दि.२५) रात्री दहा वाजता घडली. याप्रकरणी १४ जणांना अटक करण्यात आली. ३५ जण फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरत-भुसावळ पॅसेंजरने काल एक महिला प्रवास करीत होती. यादरम्यान या महिलेचा अन्य प्रवाशांसोबत वाद झाला. यानंतर या महिलेने सोनगड रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर रेल्वे पोलिसांकडे आपली छेड काढल्याची तक्रार केली. नंदुरबार रेल्वे स्थानकात रात्री नऊ वाजता ही पॅसेंजर पोहोचल्यानंतर येथील रेल्वे पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतले. मात्र, संबंधित महिलेने नंदुरबारमधील काही लोकांना फोन करून बोलावून घेतले.

यामुळे नंदुरबार शहरातील पटेलवाडी आणि बादशहानगर भागातून सुमारे दोनशे ते तीनशे जणांचा जमाव नंदुरबार रेल्वे स्थानकावर जमला. या जमावाने छेड काढणाऱ्या संशयितांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत जमावातील काहींनी अचानक रेल्वेच्या डब्यांवर दगडफेक सुरू केली.

बेभान झालेल्या जमावाची दगडफेक रेल्वे स्टेशनबाहेर परिसरात देखील सुरू होती. दंगल सदृश परिस्थिती निर्माण होताच शहर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार शहर पोलिस निरीक्षक नंद्वाळकर हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी धावून गेले. तरीही जमावाची दगडफेक सुरू होती. या दगडफेकीत रेल्वे पोलिसांचे सहाय्यक निरीक्षक सागर भोये यांच्या डोक्याला मार लागला.  अन्य पाच कर्मचारी किरकोळ जखमी झाले.

या जमावाला आटोक्यात आणण्यासाठी अखेर शहर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर जमाव नियंत्रित झाला. या घटनेनंतर नंदुरबार रेल्वे स्थानकावर मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. विशेष धर्माच्या जमावाने धावून येणे आणि दहशत माजवणे हा प्रकार नंदुरबार मध्ये वारंवार घडू लागला असून नंदुरबार रेल्वे स्थानकावरील ही दुसरी घटना आहे.