Fri, Jun 05, 2020 14:09होमपेज › Nashik › जातीयवादी राजकारणातून समाज तोडण्याचा प्रयत्न

जातीयवादी राजकारणातून समाज तोडण्याचा प्रयत्न

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:34PM

बुकमार्क करा
मालेगाव : प्रतिनिधी

राज्यातील बौद्ध हे मूळचे मराठी, हिंदूच. त्यांचे केवळ धर्मांतर झाले आहे रक्तांतर नाही. सध्या जाती धर्माच्या नावावर समाज तोडण्याचा प्रयत्न होतो आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जातीयवादी राजकारण केले जात आहे. परंतु, शिवसेनेेने महाराष्ट्र कायम एकसंध ठेवला आहे. जाहिरातबाजीच्या जोरावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारची हवा जमिनीवर येतेय, हे गुजरात विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले. आता महाराष्ट्रातून खर्‍या अर्थाने परिवर्तनाची सुरुवात होईल आणि आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा विश्‍वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्‍त केला. 

सोयगावमधील ऐश्‍वर्या मंगल कार्यालयात बुधवारी सायंकाळी शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक करून सत्ता मिळवली. राजकारणाच्या गरजा बदलत आहेत. पहिले शब्द द्यायचा आणि नंतर तो मी नव्हेच, अशी भूमिका घेतली जाते. त्यांचा खरा चेहरा उघड झाल्यामुळेच मोदींच्या वडगाव मतदारसंघात भाजपा उमेदवाराचा दारुण पराभव झाला. गुजरातमधील काठावरील विजय पराभवासमानच असल्याचे राऊत म्हणाले. गुजरात मॉडेलचा देशभर गवगवा करता. परंतु, अशा कोणत्याही फसव्या पॅटर्नची महाराष्ट्राला गरज नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका केव्हाही लागू शकतात, असे संकेत दिले जात आहेत. त्यासाठी शिवसेना सज्ज आहे. शिवसेनेच्या दृष्टीने मालेगाव बहिष्कृत होते. परंतु, दादा भुसे यांच्या विकासात्मक राजकारण अन् संघटना बांधणीमुळे आज मालेगाव शिवसेनेचा बालेकिल्ला झाला.  त्यांच्यासारख्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या जोरावर महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकेल. विधानसभेत दीडशे आमदार गेले नाहीत, तर पुन्हा मालेगावात येणार नाही, अशा शब्दात त्यांनी विजयाची खात्री बोलून दाखवली.

मेळाव्याच्या प्रारंभी मालेगाव बाह्य मतदारसंघातील विकासकामांची चित्रफित दाखवण्यात आली. तिचा संदर्भ देत खासदार राऊत यांनी, शासनात शिवसेनेच्या मंत्र्यांना कामच नसल्याचे बोलले जाते. परंतु, मालेगावात आल्यानंतर तो आरोप निराधार ठरतो. काम करून घेणारा माणूस हवा, असे म्हणत राज्यमंत्री दादा भुसे यांचा कार्यगौरव त्यांनी केला. मालेगावमधील विकासकामे पाहून विधानसभेची चिंता वाटत नाही, लोक तुम्हाला दिल्लीतही पाठवतील, असे सांगत लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबतचे संकेतही त्यांनी दिले.

तत्पूर्वी, जिल्हाध्यक्ष सुहास कांदे, संपर्कप्रमुख सुहास सामंत यांची भाषणे झाली. आगामी निवडणुका स्वबळावर लढून जिंकण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन त्यांनी केले. नगरसेविका अ‍ॅड. ज्योती भोसले यांनी युवासेनेप्रमाणे युवतीसेना स्थापन करण्याची मागणी केली. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, रवींद्र पाटील, श्रीकांत पंडित, अल्ताफ खान, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

समाज शिवसेनेच्या पाठीशी

गत आठवड्यात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या मालेगाव दौर्‍यात विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. त्याचा थेट नामोल्लेख टाळत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे म्हणाले, शिवसेना शांततेत काम करते, त्याचे मार्केटिंग करत नाही. त्यामुळेच दुसरे सेनेच्या कामांचे श्रेय जाहिरातबाजीतून लाटण्याचा प्रयत्न करतात. जनता सर्व जाणते, तरी काळाच्या मागणीप्रमाणे प्रचार करावा लागेल असे सांगतानाच केव्हाही निवडणुका होऊ द्या. निर्विवाद भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. सर्व समाज शिवसेनेच्याच पाठीमागे असल्याचे राज्यमंत्री भुसे यावेळी म्हणाले.