Sun, Jan 19, 2020 21:59होमपेज › Nashik › गावठी कट्टा विक्रीसाठी आलेले तिघे जेरबंद

गावठी कट्टा विक्रीसाठी आलेले तिघे जेरबंद

Published On: Oct 19 2018 1:45AM | Last Updated: Oct 18 2018 11:55PMनाशिक : प्रतिनिधी

गावठी कट्ट्याची विक्री करण्यासाठी आलेल्या चौघांपैकी तिघांच्या मुसक्या आवळण्यात बुधवारी (दि.17) रात्री उपनगर पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्यांमध्ये दोघा सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. संशयितांकडून तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

उपनगरनाका परिसरात गावठी कट्ट्याची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. बसस्थानकाजवळ बलेनो कार (एमएच 15 जीएल 4397) व स्विफ्ट डिझायर (एमएच 12 एचएफ 4297) संशायास्पद उभ्या होत्या. कारमधील सुदर्शन प्रदीप शिंदे (वय 33, रा. समर्थ अपार्टमेंट, काठे गल्ली), सदाशिव पाराजी गायकवाड (वय 28, रा. म्हाडा बिल्डिंग, वडाळा गाव), अमजद दाऊद सय्यद (वय 35, रा. सय्यद बाबा चौकाजवळ, संगमनेर), इम्रान आयूबखान पठाण (रा. मोगलपुरा, देवी गल्ली, संगमनेर, जि. अहमदनगर) यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांचा संशय बळाविल्याने त्यांनी दोन्ही कारची झडती घेतली असता त्यांच्याकडे 30 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, मॅगझिनमध्ये असलेली दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी दोन्ही कारसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईची कुणकुण लागताच इम्रान पठाणने घटनास्थळावरून पोबारा केला. अटक केलेल्यांमध्ये शिंदे व गायकवाड हे सराईत, तर इतर दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. आर. जाधव अधिक तपास करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राहुल खांडेबहाले, एस. पी. कोकाटे, समीर चंद्रमोरे, बी. के. गिते, अमोल टिळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.