Tue, Jun 02, 2020 14:52होमपेज › Nashik › धरणांच्या सुरक्षितेतसाठी तीन नोडल अधिकारी

धरणांच्या सुरक्षितेतसाठी तीन नोडल अधिकारी

Published On: Jul 13 2019 1:41AM | Last Updated: Jul 13 2019 1:41AM
नाशिक : प्रतिनिधी
धरणांच्या सुरक्षितता व डागडुजीसाठी नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जलसंपदा, जलसंधारण आणि जि.प. लघुपाटबंधारे विभागाला दिले आहेत. या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील धरणांच्या डागडुजीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

गेल्याच आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात तिवरे धरण फुटून जीवित आणि वित्तहानी झाली. या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी गुरुवारी (दि.11) राज्यभरातील जिल्हा प्रशासनांना धरणांची सुरक्षितता व डागडुजीसाठी तत्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले होते. तसेच या कामांमध्ये यंत्रणांनी निधी व हद्दीचा मुद्दा बाजूला ठेवावा. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी यंत्रणांमध्ये समन्वय साधावा, असा सल्ला मेहता यांनी दिला होता. दरम्यान, मेहता यांच्या आदेशामुळे जिल्हा प्रशासन हलले असून, जिल्हाधिकार्‍यांनी तत्काळ जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी पावले उचलली आहेत. 

जिल्हाधिकारी मांढरे यांनी शुक्रवारी (दि.12) आदेश काढत जलसंपदा, जलसंधारण आणि जि. प. लघुपाटबंधारे विभागांना नोडल अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले आहे. संबंधित अधिकार्‍यांनी त्यांच्या-त्यांच्या कार्यक्षेत्रातील धरणे, पाझर तलाव, छोट्या-मोठ्या बंधार्‍यांचा आढावा घेऊन त्याचा अहवाल पंधरवड्यात  सादर करण्याच्या सूचना मांढरे यांनी दिल्या आहेत. 

धरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निकाली

जिल्ह्यात छोटी-मोठी धरणे, पाझर तलाव, बंधारे मिळून साधारणत: 1800 च्या वर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्‍वरमधील बेरवळ आणि पेठ तालुक्यातील एक बंधारा फुटल्याची घटना घडली. या पार्श्‍वभूमीवर डागडुजीसाठी नोडल अधिकार्‍यांच्या नेमणुकीचा निर्णय हा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या बळकटीचा प्रश्‍न निकाली लागणार आहे.