Tue, May 26, 2020 12:33होमपेज › Nashik › अमेरिकेतील तीन मित्रांनी भागविली कोटंबीची तहान

अमेरिकेतील तीन मित्रांनी भागविली कोटंबीची तहान

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 1:45AMनाशिक : गजानन काशीकर

जगात कुठेही भारतीय माणूस गेला तरी तो भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कार विसरत नाही. भारताबाहेर जे लोक नोकरी, व्यवसायानिमित्ताने जातात त्यातील बरेच लोक हे कायम भारतातील अनेक समस्यांमध्ये गरजूंची मदत करत असतात. अशीच मदत अमेरिकेतील तीन भारतीय तरुणांनी जिल्ह्यातील कोटंबी या गावाला केली आहे.

देशात अनेक ठिकाणी पाउस पडूनही उन्हाळ्यात कोरडा दुष्काळ असतो. दुष्काळ असलेल्या गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र, काही गावात लोक अनेक किलो मीटर पायी जाउन पाणी आणतात. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात असलेल्या अतिदुर्गम  कोटंबी गावची पाणी समस्या देखील अतिशय बिकट होती. हे गाव डोंगराळ भागात असल्याने येथून जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर एका विहिरीतून महिलांना पाणी आणावे लागत असे, तसेच विहिरीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी दरी पार करावी लागायची. या गावात एक  विहीर होती पण ती जानेवारी ते जुलै दरम्यान कोरडी असायची. या दरम्यान सोशल नेटवर्किंग फोरमने या गावाचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी सर्वे करुन गावाला मदत करायचे ठरवले.

कोटंबी गावाच्या पाणी समस्या सोडवण्याचे श्रेय अमेरिकेतील तीन भारतीय तरुणांना जाते. अमेरिकेतील जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीत योगेश कासट, राहुल मेहता आणि जे. जे. यादव हे तीन मित्र काम करतात. त्यांना सोशल नेटवर्किंग फोरमच्या कामाबद्दल कळल्यावर त्यांनी कोटंबी गावचा पाणीप्रश्‍न सोडवण्याची जबाबदारी घेतली. यासाठी प्रत्येकी 500 डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 32,605 रुपये याप्रमाणे निधी जमा करून 97,815 रुपये फोरमच्या बँक खात्यात जमा केले. इतकेच नाही तर या तिघांनी अजून दोन लाख रुपये निधी अमेरिकेतीलच त्यांच्या मित्रांकडून जमा करुन कोटंबीसाठी पाठवणार आहेत. त्यासाठी त्यांनी एक फंड रेजर लिंक सुद्धा तयार केली आहे.

सोशल नेटवर्किंग फोरम ही एक ऑनलाइन सामाजिक संस्था असून, आदिवासी पाड्यातील आणि दुर्गम भागातील गावांना मदत करते. ही संस्था विशेषत: गावातील पाणीप्रश्‍न सोडवते. यासाठी संस्थेकडे जिओलॉजिस्ट, इंजिनिअर्सची टीम असून, ती टीम प्रत्येक गावात जावून तेथील पाणी समस्या जाणून  त्यावर उपाय शोधून काढते. यानंतर सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून निधी गोळा केला जातो आणि त्या गावाला पाणी पुरवले जाते. आतापर्यंत यासंस्थेने 9 गावांना जलयुक्त केले आहे आणि कोटंबी हे त्यातील दहावे गाव असणार आहे.

 

Tags ; Nashik, Nashik news,  Kotambi, youths help,