Tue, Jun 02, 2020 14:16होमपेज › Nashik › जवानांचे बलिदान वाया जाणार नाही 

जवानांचे बलिदान वाया जाणार नाही 

Published On: Feb 22 2019 2:03AM | Last Updated: Feb 22 2019 12:23AM
जळगाव : प्रतिनिधी

पुलवामात येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान वाया जाणार नाही. शहीद कुटुंबीयांच्या एक-एक अश्रूचा बदला घेतला जाईल. सध्याचा भारत हा नवीन भारत आहे. भारतीय सेना मजबूत असून, ती शांत बसणार नाही. असे सांगतानाच शहिदांच्या कुटुंबांच्या पाठीशी सव्वा कोटी जनता कुटुंब म्हणून उभी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, खा. रक्षा खडसे, आ. एकनाथ खडसे, आ. संजय सावकारे, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. हरिभाऊ जावळे, आ. राजू भोळे, माजी आमदार दिलीप भोळे, डीआरएम यादव, नगराध्यक्ष रमण भोळे, नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यासह भुसावळ नगरपालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, कृषी विद्यापीठासाठीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असून, एकनाथ खडसे यांनी प्रयत्न केलेल्या विद्यापीठाचे लवकरच काम सुरू होणार आहे. त्यासाठी लवकरच निधी दिला जाईल, ‘मेगा रिचार्ज’ प्रकल्प हा जगातला मोठा अजूबा असणार आहे. हा प्रकल्प जगातील आठवे आश्‍चर्य राहील. या प्रकल्पाच्या डीआरडीला तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. तसेच पंतप्रधानांची मान्यता मिळाली आहे. यासाठी सहा कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. जिल्ह्यात जी कामे झालेली आहेत ती युतीच्या काळात झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व खंबीर असून, त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच भुसावळमधील विस्थापित झालेल्यांना घरे मिळण्यासाठी तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. तर कॅबिनेटच्या बैठकीत जाहीर मंजुरी देखील दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावेळी सावदा, निंभोरा, बोदवड येथील ओव्हरब्रिजचे, 15 कोटी रस्ता कामांचे तसेच प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या कार्याचा अहवाल समर्पणवादी आहे. अनेक नेते अनेक वेळा निवडून येतात पण जनतेला केलेल्या कार्याचा अहवालच देत नाहीत. खा. रक्षा खडसे या तरुणच नाही तर कार्यक्षम खासदार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. खा. रक्षा खडसे यांनी प्रास्ताविक केले.