Tue, Nov 19, 2019 06:20होमपेज › Nashik › जुने नाशिक भागातील जीर्ण वाड्यांचा प्रश्‍न सुटणार

गावठाणच्या विकासासाठी चार ‘एफएसआय’ची मागणी 

Published On: Aug 06 2019 1:48AM | Last Updated: Aug 06 2019 1:48AM
नाशिक : प्रतिनिधी

मुंबई आणि ठाणे महानगराच्या धर्तीवर क्लस्टर विकास योजना राबविताना जुने नाशिक या गावठाण भागाला चार इतके चटई क्षेत्र लागू करण्याचे प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. क्लस्टरमुळे जुने जीर्ण वाडे आणि इमारतींचा प्रश्न दूर होणार आहे. क्‍लस्टरविषयी करण्यात येणार्‍या सर्वेक्षणासाठी निविदा प्रसिध्द करण्यात आली असून, सल्लागार संस्थेची नेमणूक लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी जुने नाशिक भागासाठी क्‍लस्टर योजना लागू करण्याबाबत प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याविषयी शासनाने महापालिकडून अहवाल मागितला होता. मात्र अद्याप त्याविषयीची कार्यवाही झालेली नाही. मागील आठवड्यात विविध प्रश्‍नांबरोबरच क्‍लस्टर डेव्हलपमेंटविषयी मंत्रालयात प्रश्‍न उपस्थित करण्यात आला असता तत्काळ सल्लागार संस्थेची नेमणूक करण्याचे आदेश मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी मनपाला दिले होते. त्यानुसार निविदा प्रसिध्द करण्यात आली असून, लवकरचर सर्वेक्षण सुरू होईल. असे गमे यांनी सांगितले. जुने नाशिक भागात विकास करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. यामुळे परिसर अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. नव्या विकास आराखड्यातही या भागासाठी चार एफएसआय प्रस्तावित करण्यात आला आहे. या भागासाठी क्लस्टर म्हणून विकास करणे आणि एसआरए योजना लागू करण्याबाबतच्या या निर्णयामुळे जागेचा प्रश्‍न निकाली निघेल. ‘इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट’ अर्थात, आघात अहवालानंतर सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. प्रत्यक्षात आराखडा मंजूर झाला तेव्हा गावठाणाला दीड एफएसआय देण्यात आला. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये नाराजी होती. -

ठेकेदारांचे जेसीबी वापरणार

पूरपरिस्थितीनंतर साचलेला गाळ व पाणी बाहेर काढण्यास प्राधान्य दिले जात आहे. मातीचे ढीग साचलेले आहेत. परंतु, मनुष्यबळ कमी पडत आहे. सध्या पावसाळा असल्याने अनेक ठेकेदारांची कामे बंद असल्याने त्यांच्या मशिनरींचा वापर करण्यासाठी शहर अभियंता संजय घुगे यांना कळविले आहे. त्यानुसार कामे हाती घेतली जातील. ठेकेदारांनी शहराप्रती आपले योगदान द्यावे, असे आवाहनही आयुक्‍त गमे यांनी केले आहे. 

आयुक्‍तांकडून कानोसा 

मनपा मुख्यालयासह सहाही विभागात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केले आहे. याठिकाणाहून नागरिकांना मदत केली जात असून, माहिती दिली जाते. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. या ठिकाणचे कर्मचारी नगारिकांशी कशाप्रकारे संवाद साधतात मदत करतात का याबाबतची माहिती घेण्यासाठी आयुक्‍त स्वत:च संबंधित ठिकाणच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नाव न सांगताच कानोसा घेत आहेत. नाशिकरोड येथील आपत्ती निवारण कक्षातील टेलिफोन बंद असल्याचे आयुक्तांना समजताच त्यांनी ही बाबत निदर्शनास आणून दिली. अशा प्रकारची शहानिशा मी करत असल्याचे त्यांनी सांगितले.