Fri, Jun 05, 2020 04:18होमपेज › Nashik › हीना गावितांच्या उमेदवारीविरुद्धची याचिका फेटाळली

हीना गावितांच्या उमेदवारीविरुद्धची याचिका फेटाळली

Published On: Apr 17 2019 2:10AM | Last Updated: Apr 16 2019 11:55PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

नंदुरबार मतदारसंघातील भाजपाच्या खासदार आणि उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या उमेदवारी विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली. निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांनी नकार देत ती निकाली काढली.

अपक्ष उमेदवार डॉ. सुहास नटावदकर यांनी गावित यांच्याविरोधात सदर याचिका दाखल केली होती त्यानुसार गावित यांनी उमेदवारी अर्जासोबत  निवडणूक नियम क्रमांक चारप्रमाणे शपथपत्र दाखल केले होते. हे शपथपत्र शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दिले होते . मात्र, स्टॅम पेपर कोठून खरेदी केला तसेच कोणत्या कामासाठी त्याचा उपयोग करणार, यासह त्यावर स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे हा स्टॅम्प पेपर बोगस असल्याचा दावा करीत याचिकाकर्त्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तसेच गावित यांनी त्यांच्यावर आई आणि बहीण या अवलंबून असल्याचे म्हटले होते.  त्यांची आई माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या तर बहीण ही व्यावसायिक आहे. या दोघींचे उत्पन्न हिना गावित यांच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट आहे. तसेच गावित यांनी उत्पन्‍नाचे साधन शेती असल्याचे नमूद केले आहे. त्या विद्यमान खासदार असून, केंद्राकडून त्यांना भत्ता आणि इतर लाभ मिळत असून, याबाबतची माहिती त्यांनी शपथपत्रात नमूद केली नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी विनंती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सदर आक्षेप फेटाळल्यानंतर डॉ. नटावदकर यांनी उच्च न्यायालय खंडपीठात धाव घेतली.

याचिकेच्या सुनावणीनंतर, खंडपीठाने निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे यात हस्तक्षेप करता येणार नाही, असे मत मांडून हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका निकाली काढली. निवडणुकीनंतर या मुद्यांवर कायद्याप्रमाणे उपलब्ध असलेल्या योग्य त्या न्यायालयासमोर दाद मागता येईल आणि त्यावर या निर्णयाचा काहीही संदर्भ नसेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. ज्ञानेश्‍वर बागूल आणि अ‍ॅड. विष्णू मदन (पाटील) यांनी काम पाहिले.