Tue, May 26, 2020 13:10होमपेज › Nashik › सिंचन योजनांना निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस 

सिंचन योजनांना निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री

Published On: Apr 25 2019 1:45AM | Last Updated: Apr 25 2019 1:45AM
सटाणा : वार्ताहर

डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या तालुक्यातील सिंचन योजनांना पैसा कमी पडू देणार नाही. एवढेच नव्हे तर 51 कोटी रुपये निधी दिलेली सटाणा शहर पाणीपुरवठा योजनासुद्धा कुठल्याही परिस्थितीत पूर्णत्वास नेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बुधवारी (दि.24) येथील पाठक मैदानावर आयोजित धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपा-सेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका करताना मोदी सरकारच्या काळात झालेला विकास व घेतलेल्या निर्णयांबाबत सविस्तर भाष्य केले. व्यासपीठावर जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी राज्यमंत्री भुसे, रावल व महाजन यांनी उपस्थितांना मतदानासाठी आवाहन केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुमारे पंचवीस मिनिटे भाषण करून केंद्रात भक्‍कम शासन देण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले. काँग्रेस शासनाने गेली 55 वर्षे भ्रष्टाचार व अत्याचाराची राजवट दिली. तर मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला उभे करण्याचे काम केले. काँग्रेसने तयार केलेली दलालांची फौज नेस्तनाबूत करण्याचे काम केले. दुसरीकडे देशाचा स्वाभिमानही जागवला, असेही फडणवीस म्हणाले. डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत. या कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच सटाणा शहर पाणीपुरवठा योजना ही कुठल्याही परिस्थितीत पूर्णत्वास नेली जाईल, असे त्यांनी सांगितलेे.

शेती व शेतकरी मुद्यांना बगल ः नाशिक जिल्हा देशात सर्वाधिक कृषिप्रधान तसेच कृषी आंदोलनांसाठी ख्यातकीर्त आहे. त्यातही बागलाण तालुका कृषी उत्पादन आणि आंदोलनांबाबतीतही आघाडीवर असतो. कांद्याला गेल्या वर्ष- दीड वर्षापासून भाव मिळत नसल्याने तो मातीमोल भावाने विकावा लागतो. त्यामुळे उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भाजपा शासनविरोधी भावना असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री फडणवीस याविषयी सविस्तर काही भाष्य करतील असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी मात्र पंतप्रधान मोदी यांच्या कामगिरीवरच अधिक वेळ भाष्य केले. कांदा या विषयावर कुठलेही सविस्तर भाष्य न करता शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दीडपट हमीभाव या मुद्यांनाही मुख्यमंत्र्यांनी बगल दिल्याचे दिसून आले.

कडक बंदोबस्त ः सभेसाठी अतिशय कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तपासणीनंतरच सभामंडपात सोडण्यात येत होते. अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पोलीस उप अधीक्षक शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक वासुदेेव देसले आदींसह जिल्हाभरातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याचे दिसून आले.