Wed, Jun 03, 2020 22:10होमपेज › Nashik › मालेगाव : घातपाताच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला अटक

मालेगाव : घातपाताच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला अटक

Published On: Mar 15 2019 6:05PM | Last Updated: Mar 15 2019 6:00PM
मालेगाव : प्रतिनिधी

घातपाताच्या तयारीतील असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या तिघांकडून १४ धारदार तलवारी व एक कुकरी असा शस्त्रसाठा देखील पोलिसांनी यावेळी जप्त केला. शुक्रवारी (दि.१५) सकाळच्या सुमारास जुना मुंबई - आग्रा महामार्गावरील हॉटेल अप्सरा परिसरात ही कारवाई करण्यात आली.

मोहंमद मुजाहिद शब्बीर अहमद (वय २१, रा. समदहबीब कंपाऊंडजवळ, मालेगाव), मुजम्मील हुसेन इफ्तेकार अहमद उर्फ भोला (21, रा. कमालपुरा, गल्ली नंबर १), वसिम अहमद जमील अहमद अन्सारी (१९, रा. कमालपुरा, मालेगाव) अशी अटक केलेल्या तीघा आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगणारी टोळी नवीन बसस्थानक परिसरात आली असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून हॉटेल अप्सरा परिसरातून या तिघा संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी या तिघांकडून १४ तलवारी व एक कुकरी आढळून आली. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

याचप्रमाणे या पथकाने आठवड्याभरात येवला, वणी व सायखेडा परिसरात कारवाई करीत पाच तलवारी व एक गुप्ती हस्तगत केली. तिघा आरोपींनाही अटक केली आहे. या पथकात सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनिल अहिरे, हवालदार वसंत महाले, सुहास छत्रे, नाईक राकेश उबाळे, चेतन संवत्सरकर, फिरोज पठाण, रतिलाल वाघ, दत्ता माळी यांचा समावेश होता.