Fri, Jun 05, 2020 14:57
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › उमेदवारांचे भवितव्य उद्या ईव्हीएममध्ये बंद

उमेदवारांचे भवितव्य उद्या ईव्हीएममध्ये बंद

Published On: Aug 30 2019 1:41AM | Last Updated: Aug 30 2019 1:41AM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींसाठी शनिवारी (दि.31) मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा ग्रामपंचायत विभाग सज्ज झाला आहे. निवडणूक होत असलेल्या ठिकाणी सरपंचपदासाठी 18 तर सदस्यांसाठी 76 उमेदवार रिंगणात आहे.  प्रशासनातर्फे मतदान प्रक्रियेसाठी 230 अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिकसह राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये शनिवारी (दि.31) सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत मतदान पार पडणार आहे. मतदान केंद्राधिकारी व कर्मचारी हे शुक्रवारी (दि. 30) ईव्हीएम व मतदान साहित्यासह केंद्रांवर रवाना होतील. 

पाच तालुक्यांतील 18 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 60 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. ईव्हीएमवर या निवडणुका घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येकी 81 बॅलेट आणि कंट्रोल युनिटचा वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील 25 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने घोषित केला होता. त्यापैकी नाशिक तालुक्यातील गौळाणे ग्रामपंचायतीत एकही अर्ज दाखल झाला नव्हता. तर बुधवारी (दि.21) झालेल्या माघारीनंतर सहा ग्रामपंचायती बिनविरोध घोषित करण्यात आल्या. यामध्ये बागलाण तालुक्यातील विसापूर, कपालेश्‍वर व तुंगणदिगर तसेच मालेगावमधील सातमाने, बेळगाव, दुंधे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

या ग्रामपंचायतींत मतदान : निवडणुका होत असलेल्या 18 ग्रामपंचायतींमध्ये नाशिक तालुक्यातील संसरी व शिवणगाव, मालेगावमधील पोहाणे, लुल्ले, पळसदरे, निफाड तालुक्यातील धारणगाव खडक, येवल्यातील जऊळके, निळखेडे, दुगलगाव, पांझरवाडी तसेच बागलाण तालुक्यातील अंबापूर, जाड, पिंगळवाडे, भिलवाड, खांबलोण, मोरकुरे, दहिंदुले आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.