Wed, Jun 03, 2020 20:39होमपेज › Nashik › धुळे : लाच स्वीकारताना अभियंत्यास रंगेहात पकडले

लाच स्वीकारताना अभियंत्यास रंगेहात पकडले

Published On: Feb 19 2019 6:52PM | Last Updated: Feb 19 2019 6:54PM
धुळे : प्रतिनिधी 

शिंदखेडा पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्यास चार हजाराची लाच घेताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई धुळे तालुक्यातील सोनगीर येथील मुंबई -आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाच्या खाली करण्यात आली. यासंदर्भात सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदखेडा तालुक्यातील वायपूर शिवारात तक्रारदार यांच्या आईच्या नावे शेती आहे. या शेतील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरीसाठी २ लाख ९० हजार रुपये मंजूर झाले होते. यापैकी खोदकामासाठी १ लाख ७६ हजार ८८० रुपयांचे अनुदान मिळाले आहे. तर बांधकामासाठीचे १ लाख १३ हजार १२० रुपयांचे अनुदान थकीत आहे. या थकीत अनुदानाची रक्कम मिळावी यासाठी संबंधीत तक्रारदारांनी शिंदखेडा पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता शरद फकीरा पाटील यांच्याबरोबर संपर्क केला. यावेळी पाटील यांनी रक्कम मिळण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितली. पण, ही रक्कम देणे शक्य नसल्याने संबंधित तक्रारदारांनी धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिस उपअधिक्षक सुनील कुराडे व पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर यांनी सापळा रचला. 

अभियंता शरद पाटील यांनी सोनगीर येथील मुंबई -आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाजवळ संबंधीत तक्रारदारास बोलावले. पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर व संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, जयंत साळवे, संतोष हिरे, सुधीर सोनवणे कैलास जोहरे, शरद काटके या पथकाने सापळा लावला. यावेळी पाटील यांनी चार हजार रुपये स्विकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. यासंदर्भात सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.