Wed, Jun 03, 2020 09:07होमपेज › Nashik › लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

Published On: May 11 2019 2:05AM | Last Updated: May 10 2019 11:54PM
नाशिक  :  प्रतिनिधी  

निवडणूक शाखेने येत्या 23 मे रोजी होणार्‍या मतमोजणीसाठी तयारी पूर्ण केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाची 19 ते 26 फेर्‍यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची 19 ते 25 फेर्‍यांमध्ये मतमोजणी पूर्ण होऊन निकालाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे  जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने सांगितले.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा  मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात मागील 29 एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे ही वेअर हाउस येथ सील करून ठेवण्यात आली आहेत.  येत्या 23 मे रोजी दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी जवळपास पूर्ण केली असून, 14 टेबलांवर मतमोजणी केली जाईल. दोन्ही मतदारसंघांत विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी केली जाणार असून, त्यादृष्टीने नियोजनदेखील करण्यात आले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात 19 ते 27 फेर्‍यांमध्ये मतमोजणी होणार आहे. त्यात देवळाली मतदारसंघात 19 फेर्‍या होणार असून, नाशिक पश्‍चिम मतदारसंघात 27 फेर्‍यांपर्यंत निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 19 ते 25 फेर्‍या होतील. त्यात निफाड मतदारसंघात 19 फेर्‍या होणार असून, नांदगाव व कळवण - सुरगाणा मतदारसंघात प्रत्येकी 25 फेर्‍या होणार असून, त्यानंतर निकालाचे  चित्र स्पष्ट होणार आहे.