Mon, Nov 18, 2019 19:47होमपेज › Nashik › नाशिकमधून ४१, दिंडोरीतून २७ अर्ज

नाशिकमधून ४१, दिंडोरीतून २७ अर्ज

Published On: Apr 10 2019 2:01AM | Last Updated: Apr 09 2019 11:23PM
नाशिक : प्रतिनिधी

लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (दि. 9) संपुष्टात आली. नाशिकमधून 41 तर दिंडोरीतून 27 अर्ज दाखल झाले आहेत. आज (दि. 10) जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज छाननी प्रक्रिया होणार असून, शुक्रवारी (दि.12) दुपारी 3 पर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतरच दोन्ही मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अर्ज भरण्याची प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरू झाली. मात्र, अखेरच्या दोन दिवसांमध्ये म्हणजेच सोमवारी (दि.8) आणि मंगळवारी (दि.9) उमेदवारांची झुंबड उडाली. नाशिक मतदारसंघातून भाजपा-शिवसेना युतीतर्फे हेमंत गोडसे तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून समीर भुजबळ यांनी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार अ‍ॅड. माणिक कोकाटे व त्यांची मुलगी जि. प. सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी अपक्ष तर वंचित बहुजन आघाडीकडून पवन पवार यांनी अर्ज दाखल केला.

दिंडोरी मतदारसंघातून युतीकडून डॉ. भारती पवार तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून धनराज महाले यांनी अर्ज  दाखल केले. माकपाकडून जे. पी. गावित आणि हेमंत वाघेरे यांनी अर्ज भरले आहेत. तर  वंचित बहुजन आघाडीचे बापू बर्डे हे येथून रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातून 15 उमेदवारांचे 27 अर्ज दाखल झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज  (दि. 10) छाननी होणार आहे. नाशिकच्या अर्जांची छाननी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे तर दिंडोरीची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर यांच्याकडे होईल. दरम्यान, अर्ज छाननीनंतर शुक्रवारी (दि. 12) दुपारी तीनपर्यंत माघार घेता येईल. छाननीत कोणाचा पत्ता कट होणार तसेच अ‍ॅड. कोकाटे यांचे बंड भाजपा थोपविणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

अर्ज दाखल केलेले उमेदवार : नाशिक :- हेमंत गोडसे (शिवसेना), समीर भुजबळ (राष्ट्रवादी), शेफाली भुजबळ (राष्ट्रवादी), पवन पवार (वंचित बहुजन आघाडी), माणिक कोकाटे (अपक्ष), करण गायकर, सीमंतिनी कोकाटे, महेश आव्हाड, विनोद शिरसाठ, धनंजय भावसार, देवीदास सरकटे, सुधीर देशमुख, प्रकाश कनोजे, रमेश भाग्यवंत, वैभव आहिरे, विलास देसले, प्रियंका शिरोळे, शरद धनराव, शरद आहेर, सोनिया जावळे, शत्रुघ्न झोंबाड, राजू कटाळे, विष्णू जाधव, रंगा सोनवणे, मंगेश ढगे, सिंधुबाई केदार, भीमराव पांडवे, संजय घोडके, शिवनाथ कासार, शिवाजी वाघ.

दिंडोरी :- डॉ. भारती पवार (भाजपा), धनराज महाले (राष्ट्रवादी), जे. पी. गावित (माकपा) बापू बोर्डे (वंचित बहुजन आघाडी), अशोक जाधव (बसपा), हेमंत वाघेरे (माकपा), प्रवीण पवार (भाजपा), वैभव महाले (राष्ट्रवादी), दत्तू बर्डेे, बाबासाहेब बर्डे (भारतीय ट्रायबल पक्ष), शिवाजी मोरे(राष्ट्रीय किसान काँग्रेस पक्ष), गाजी एतेजाद अहमद खान, दादासाहेब पवार, हेमराज वाघ, टी. के. बागूल (सर्व अपक्ष).