Tue, Nov 19, 2019 06:15होमपेज › Nashik › वीज वितरण कार्यालयात ग्राहकाचा आपल्याच पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न(व्हिडिओ)

वीज वितरण कार्यालयात ग्राहकाचा पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न(व्हिडिओ)

Published On: Sep 06 2018 6:43PM | Last Updated: Sep 06 2018 6:43PMनासिक रोड : वार्ताहर 

जेलरोड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न एका ग्राहकाने केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रसंगावधान राखत येथील कर्मचाऱ्यांनी हा प्रसंग रोखल्यामुळे अनर्थ टळला. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक रोड येथील शारदा बाळकृष्ण दनदने यांच्या मालकीचा स्नेहधारा अपार्टमेंट मॉडेल कॉलनी वसंत विहार मागे फ्लॅट असून, या फ्लॅटमध्ये प्रशांत जाधव गेल्या सात महिन्यांपासून भाडेकरू म्हणून राहतात. सहा महिन्यांपासून प्रशांत जाधव यांनी घराचे वीजबिल भरले नसून त्यांना वारंवार महावितरण कार्यालयाने नोटिसा देऊन कर्मचारी पाठवून समज दिली होती. मात्र, वेळोवेळी वीज बिल भरायचे टाळल्याने महावितरण कर्मचाऱ्यांनी त्यांचा वीज पुरवठा खंडित केला. काल सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रशांत जाधव आणि त्यांची पत्नी  या वीज वितरण कार्यालयात आल्या आणि आमची लाईट का कट केली म्हणून हुज्जत घालू लागले. यावेळी योगेश आहेर या अभियंत्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि वीज बिल भरा तुमचे कनेक्शन तात्काळ सुरू करून देतो असे आश्वासन दिले. मात्र, कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे काहीही न ऐकता प्रशांत जाधव याने आणि त्यांच्या पत्नीने अधिकाऱ्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोलची बाटली ओतली. पेट्रोलची बाटली पत्नीच्या अंगावर ओतल्याने सर्वांची भंबेरी उडाली. पत्नीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल असल्याचे पाहून ती स्वतः घाबरली आणि त्यानंतर पत्नीने वीज वितरण कार्यालयातून पती प्रशांत याला  बाहेर घालवून कार्यालयाचा दरवाजा बंद केला.  त्याच्या पत्नीने अंगावरील रॉकेल ओढणीच्या सहाय्याने पुसायचा प्रयत्न केला. त्यानंतर तो दरवाजाला लाथ मारून आतमध्ये आला व पत्नीला आग लावण्याचा प्रयत्न केला मात्र, कर्मचाऱ्यांनी त्याला रोखले. हा प्रसंग आजूबाजूच्या0 रस्त्यावरील नागरिक आणि वीज बिल भरायला येणारे ग्राहकही पाहत होते. 
कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने एक अनुचित प्रकार टाळल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेची खबर तात्काळ उपनगर पोलिस स्टेशनला दिली असून, उपनगर पोलिस स्टेशनला प्रशांत जाधव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास उपनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, वीज वितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत जाधव हा माथेफिरू असून त्याने अनेक वेळा वीज वितरण कार्यालयात गोंधळ घातलेला आहे. त्याच्याकडे वीज बिल भरायला पैसे नसल्याने  त्याने हा प्रकार केला असून  ही स्टंटबाजी म्हणावी की पत्नीला जाळण्याचा प्रयत्न याबाबत संभ्रम असून वीज वितरण कार्यालयातील अभियंता यांना त्याने अनेक वेळेस धमक्या दिलेल्या आहेत.