Fri, May 29, 2020 09:07होमपेज › Nashik › राईनपाडा हत्याकांड; अफवाखोरांवर गुन्हा दाखल 

राईनपाडा हत्याकांड; अफवाखोरांवर गुन्हा दाखल 

Published On: Jul 11 2018 4:42PM | Last Updated: Jul 11 2018 4:41PMधुळे : प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात पाच भिक्षुकांची हत्‍या केल्‍याची दुर्दैवी घटना घडली. धुळे जिल्हयामधे मुले पळविणारी टोळी आल्याची व्हॉटसअॅपच्या माध्यमातून अफवा पसरविण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.  धुळे शहर पोलिस ठाण्यात आज बुधवारी अज्ञात अफवाखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिस अधिक्षक यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक पोलिस ठाण्यात गोपनीय पथक असताना ही अफवा त्याच वेळी त्यांच्या निदर्शनास का आली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयाकडून माहिती घेण्यात आली आहे.

धुळे जिल्हयामधील राईनपाडा गावात निरपराध पाच जणांवर मुले पळविणारी टोळी असल्याच्या अफवेतून जिवघेणा हल्ला करून त्यांना जिवे ठार मारण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस दलाने सुरू केला असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतून अफवाखोरांवर टिकेची झोड उठविण्यात आली आहे. हत्याकांडाच्या पूर्वी शहरी तसेच ग्रामीण भागामधे व्हॉटसअॅपच्या माध्यमातून मुळे पळवणारी तसेच मुलांच्या किडण्यांचा काळाबाजार करणारी टोळी आल्याचे संदेश पसरविले जात होते. यातूनच १ जुलै रोजी राईनपाडा गावात पाच निरपराध तरूणांना आपला प्राण गमवावा लागला होता. या घटनेनंतर पोलिस महानिरीक्षक छोरींग दोर्जे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जिल्हा पोलिस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यानंतर आता धुळे शहर पोलिस ठाण्यात अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेड काँस्टेबल चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम 65 सह भादंवी कलम 505 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीमधे धुळे जिल्हयामधे 20 जून पूर्वी मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरविली गेली असल्याचे म्हटले आहे. लहान मुलांना पळविल्यानंतर त्यांच्या किडण्या तसेच अन्य अवयव काढुन घेतले जात असल्याचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरल्याने १ जुलै रोजी राईनपाडा गावात पाच जणांना ठार केले गेल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, हा गुन्हा 20 जुन पूर्वी धुळे जिल्हयात सोशल मीडियाच्या माध्यमातून घडत असताना पोलिस दलातील गुप्तचर विभाग काय करत होता? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा पोलिस दलात प्रत्येक पोलिस ठाण्यात गोपनीय विभाग तयार करण्यात आला आहे. या बरोबरच डिएसबी तसेच एसआयटी आणि एसआयबीची शाखा देखील आहे. या शाखांमधील कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे जिल्हयात होणाऱ्या समाजविघातक घटनांची नोंद करून त्याची माहिती वेळेपूर्वी वरीष्ठ अधिकाऱ्यांना देण्याची जवाबदारी असते. मात्र, राईनपाडा येथे अफवेतून हत्याकांड घडेपर्यंत या विभागाला माहिती मिळाली नसल्याने या विभागांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्‍थित होत आहे. 

दरम्यान, धुळयात अफवाखोरांवर गुन्हा दाखल झाल्याची दखल राज्याचे गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांच्यापर्यंत पोहोचली असून त्यांच्या कार्यालयातून तपास अधिकारी गांगुर्डे यांच्याकडून या गुन्हयाची माहिती घेण्यात आली आहे.