Fri, Apr 03, 2020 08:58होमपेज › Nashik › मुलाने केला वडिलांचा खून

मुलाने केला वडिलांचा खून

Published On: Apr 13 2019 1:46AM | Last Updated: Apr 13 2019 12:35AM
जानोरी :  वार्ताहर

मनोरुग्ण मुलाने वडिलांचा खून करून स्वत:लाही जखमी केल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे घडली आहे. रमेश नामदेव पवार (50) असे मयत व्यक्‍तीचे नाव असून, संशयित मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबत दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चाचडगाव शिवारात उमराळे बुद्रुक येथील रमेश नामदेव पवार हे मनोरुग्ण असलेला मुलगा सागर रमेश पवार (27) याच्यासह  शेतकरी राहुल चव्हाण यांच्या शेतात मजूर म्हणून राहतात. गुरुवारी (दि.11)  सायंकाळी 8 वाजेच्या दरम्यान संशयित सागर याने अचानक वडील रमेश पवार यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. त्यात रमेशचा जागीच मृत्यू झाला. तसेच सागरने स्वत:लाही मारहाण करीत जखमी केले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत योगिता पवार यांनी शुक्रवारी (दि.12) दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करीत संशयितास ताब्यात घेतले.कळवण विभागाचे उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, योगेश शिंदे ज्ञानेश्‍वर आव्हाड तपास करत आहेत.

कुटुंबातील सदस्यांना नेहमी मारझोड

संशयित आरोपी सागर मनोरुग्ण असल्याने त्याच्यावर बर्‍याच दिवसापासून खासगी रुग्णालयात उपचार औषधे सुरू होते. परंतु तो औषधे घेत नव्हता. त्याला विविध मांत्रिकांकडे नेण्यात येत असल्याचेही समजते. तसेच तो त्याची आई, वडील व भावजाई यांना नेहमीच मारझोड करीत असल्याची माहितीही त्याच्या कुटुंबीयांनी दिली.