Fri, Jun 05, 2020 04:58होमपेज › Nashik › जिल्ह्यात ग्रामनिधीमध्ये तब्बल 11 कोटींचा अपहार

जिल्ह्यात ग्रामनिधीमध्ये तब्बल 11 कोटींचा अपहार

Published On: Mar 24 2018 1:52AM | Last Updated: Mar 24 2018 1:07AMयेवला : अविनाश पाटील

ग्रामपंचायतीचा कारभार करताना सरपंच, ग्रामसेवकाने ग्रामनिधीच्या माध्यमातून गेल्या 56 वर्षांपासून गावांना कसे लुटले हे समोर नुकतेच आले आहे. वेळोवेळी लेखापरीक्षणात ताशेरे ओढूनही ग्रामनिधीत 11 कोटींहून अधिक रुपयांचा अपहार झाला आहे. लुटीचाप्रकार आजही राजरोस सुरू आहे. अपहार प्रकरणात 680 ग्रामसेवक तर, 129 सरपंच दोषी आढळले आहेत, तर या प्रकरणातील 46 ग्रामसेवक मयत झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या अपहार रकमेची वसुली कशी होणार, हा यंत्रणेला प्रश्‍न पडला आहे.

जिल्ह्यात स्थानिक लेखा निधी शाखेने वेळोवेळी लेखापरीक्षण करून आक्षेप नोंदविलेले असताना त्याकडे दुर्लक्ष करून कोट्यवधी रुपयांच्या ग्रामनिधीचा अपहार जिल्ह्यातील ग्रामपंचयातींनी केल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त विभाग आणि विभागीय महसूल आयुक्‍त कार्यालयाकडून निदर्शनास आले आहे. हा प्रकार 1962 पासून  सुरू असल्याचे व यामध्ये सुमारे 680 ग्रामसेवक 129 सरपंच दोषी असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर कारवाई केल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. या प्रकरणी आ. अनिल कदम यांनी प्रश्‍न विचारला होता. त्यावेळी मंत्री मुंडे यांनी सभागृहात उत्तर दिले. आमदार अनिल कदम यांनी सभागृहात आठ कोटी 73 लाख रुपयांचा ग्रामनिधी अपहाराबाबत प्रश्‍न विचारला होता.

त्यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामनिधी अपहाराची रक्‍कम 11 कोटींहून अधिक असल्याचे आणि  ग्रामनिधीच्या अपहाराची 446 प्रकरणे आढळली असल्याचे सभागृहात निवेदन केले. जुनी प्रकरणे असल्याने ग्रामसेवक व संबंधित मयत असल्याने वसुली रखडल्याची कबुलीही मुंडे यांनी सांगितले.नाशिक जिल्ह्यातील ग्रामनिधीच्या अपहाराच्या प्रकरणात 680 ग्रामसेवक व 129 सरपंच दोषी आढळून आले असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई केली असल्याचेही उत्तरामध्ये नमूद केले आहे. जानेवारी 2018 च्या अखेर ग्रामनिधीच्या एकूण 446 प्रकरणांपैकी 200 प्रकरणांतील दीड कोटींच्या आसपासची रक्‍कम संबंधितांकडून वसूल केली. 35 प्रकरणांत पाऊण कोटी रकमेचे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. तर 20 प्रकरणांमध्ये सुमारे 37 लाख रुपये रकमेचा बोजा संबंधितांच्या मिळकतीवर चढवण्यात आला आहे.

Tags :