Tue, Nov 19, 2019 13:38होमपेज › Nashik › ‘नायक’ आयुक्‍तांसाठी ‘गोलमाल अगेन’

‘नायक’ आयुक्‍तांसाठी ‘गोलमाल अगेन’

Published On: Mar 18 2018 1:31AM | Last Updated: Mar 18 2018 1:18AMअल्पावधीतच आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे नाशिककरांच्या नजरेत सिंघम ठरलेले आयुक्‍त तुकाराम मुंढे राजकारण्यांच्या आणि ‘गोलमाल’ करणार्‍यांच्या नजरेत मात्र खलनायक ठरत आहेत. यामुळे हे गोलमाल करणारे आयुक्‍तांच्या विरोधात एकत्रित आले आहेत. कारण या दोघांचाही आटापाणी आयुक्‍तांनी बंद केल्याने सध्या सर्वांनीच नाराजीचा सूर आळविण्यास सुरुवात केली आहे. परंतु, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मुंढे यांना नाशिक येथे बसविल्याने संबंधितांचा मोठा नाईलाज झाला आहे. तरीही अधूनमधून कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून मिळेल तसा नेम धरण्यासाठी अनेकजण संधीची प्रतीक्षाच करीत आहेत. इतके सारे राजकारण महापालिकेत सुरू असूनही मुंढे यांनी आपल्या कामगिरीत तसूभरही कमतरता न आणता उलट अधिक वेगाने आपली चक्रे फिरवून महापालिकेतील अनेकांच्या चकराच बंद केल्या आहेत. 

मनपाच्या गेल्या 25 वर्षांच्या इतिहासात कृष्णकांत भोगे आणि त्यानंतर डॉ. प्रवीण गेडाम यांचा कार्यकाळ नाशिकच्या दृष्टीने योग्य ठरला आहे. गेडाम यांच्या कार्यकाळात बांधकाम क्षेत्रातील कपाटाचा मुद्दा बाहेर आल्याने शहरातील बांधकाम व्यवसाय ठप्प झाला. यामुळे या क्षेत्राची नाराजी वगळता गेडाम यांनी नाशिक महापालिकेच्या अनुषंगाने कारभार सुरळीतच ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यानंतर आलेले आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांनीही शहरासाठी पार्किंग, खत प्रकल्प, स्मार्ट सिटीतील अनेक योजना, रस्त्यांची कामे अशा अनेक विकासकामांची सुरुवात करून दिली. त्यातील सर्वांत महत्त्वाची बाब कृष्णा यांच्या कार्यकाळात खत प्रकल्प व वेस्ट टू एनर्जी हे दोन प्रकल्प सुरू झाल्याने नाशिकच्या घनकचर्‍याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय हरित लवादाने बांधकामांवर आणलेली बंदी उठविण्याच्या दृष्टीनेही कृष्णा यांनी केलेले प्रयत्न आज महत्त्वाचे ठरत आहेत.

या तिन्ही आयुक्‍तांनंतर महापालिकेत आलेले तुकाराम मुंढे नाशिककरांसाठी जणू एखाद्या चित्रपटातील नायकाप्रमाणेच ठरू लागले आहेत. त्यांनी सुरू केलेली कारवाई पाहता सामान्य नागरिकांना ही बाब मनापासून पटल्याने ते त्यांच्या कामगिरीवर खूश आहेत. नद्यांमधील प्रदूषण, शहरासह उपनगरांमधील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे, शहरातील स्वच्छता, कर्मचारी व अधिकार्‍यांना लावलेली शिस्त यामुळे मनपाचा कारभार आता कुठे ठिकाण्यावर आला असे म्हणता येईल. आहे त्याच मनुष्यबळात (जे यापूर्वी इतक्या मनुष्यबळात काम करणे शक्यच नाही, असे तुणतुणे कर्मचारी संघटना आणि राजकारणी लावून बसले होते.) सध्या कामकाज बर्‍यापैकी सुरू आहे. ज्या रस्ते आणि परिसरात आजवर कधीही सफाई कर्मचारी पोहोेचले नसतील त्या ठिकाणीही स्वच्छता होताना दिसून येत असल्याने हा फरक नाशिककरांच्या नजरेला चटकन भरत आहे. यापूर्वी ही बाब अन्य कुणालाही करून दाखविता आली नाही किंवा तशी मानसिकता कुणी दाखविली नाही. कारण या अगोदरचा कारभार म्हणजे ‘आळीमिळी गुपचिळी’ असाच सुरू होता. चांगले काम करणार्‍यांना शाबासकी आणि अनियमितता व हलगर्जीपणा करणार्‍यांवर तत्काळ कारवाई अशीच आयुक्‍त मुंढे यांची कामगिरी राहिलेली आहे. अनेक वर्षांपासून धूळ खात पडून राहिलेल्या अधिकार्‍यांच्या चौकशीच्या फाइल पुन्हा उघडल्या गेल्या आहेत. याच फाइलबाबत निर्णय घेताना इतर अधिकार्‍यांचा हात कधी धजावलाच नाही.

या कामांव्यतिरिक्‍त 257 कोटींच्या रस्त्यांची कामे आणि महासभा व प्रभाग समित्यांमधील विविध विकासकामांचे प्रस्तावही आयुक्‍तांनी रोखून धरले आहेत. यामुळे नगरसेवकांची नाराजी ओढावणे साहजिकच आहे. परंतु, ही कामे थांबविण्यामागे आयुक्‍तांची त्रिसूत्री आहे. त्या कामाची गरज, उपयुक्‍तता आणि त्यासाठी निधीची तरतूद तपासूनच अशी कामे करण्याचा वा त्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आयुक्‍तांनी खातेप्रमुखांना दिले आहेत. कारण यापूर्वीच्या महापालिकेतील विकासकामांमधील अनागोंदी कारभाराला कोणी हात घातला नाही. अनेक कामे तर नियमांचे उल्लंघन करीत जादा दराने मंजूर करण्याचा जणू काही सपाटाच महापालिकेत सुरू होता. त्यातून संबंधित प्रभागातील नगरसेवक, त्यांचे समर्थक आणि ठेकेदार यांचेच ‘चांगभलं’ होत होते. आता हीच गोष्ट आयुक्‍तांनी थांबविल्यानंतर संबंधितांचा थयथयाट न झाला तरच नवल!      

- ज्ञानेश्वर वाघ

 

Tags : nashik, nashik news, nashik municipal corporation, Commissioner Tukaram Mundhe, Action