Sat, Jul 04, 2020 21:55होमपेज › Nashik › मोदी सरकारच्या अनेक घोषणा फोल : शरद पवार 

मोदी सरकारच्या अनेक घोषणा फोल : शरद पवार 

Published On: Apr 25 2019 1:45AM | Last Updated: Apr 24 2019 11:15PM
नाशिक : प्रतिनिधी

भाजपाने 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांची निवड केली. त्या निवडणुकीत जनतेनेही भाजपासह मोदींना संधी दिली. निवडून आल्यानंतर मोदींनी अनेक घोषणा केल्या. मात्र, गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने केलेल्या कामांवरून समाजाच्या हिताची कोणती कामे केली याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. तसेच भाजपा सरकारच्या काळात घेतलेला नोटाबंदीचा निर्णय, जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे लोकसभेचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारानिमित्त गिरणारे येथे आयोजित सभेत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार निर्मला गावित, जयप्रकाश  छाजेड, देवीदास पिंगळे, शरद आहेर, समीर भुजबळ, अ‍ॅड. रवींद्र पगार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’, असे मोदींनी जाहीर केले होते. पण, राफेल 450 कोटींवरून 1,650 कोटींपर्यंत पोहोचले. ज्या अंबानीने कागदाचे विमान बनविले नाही त्या अंबानीला लढाऊ विमान बनविण्याचे काम दिले. 

‘शेतकरी सुखी, तर देश सुखी’. शेतकरी हा देशाचा कणा असून, शेतीवरच देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मोदी सरकारमध्ये शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. आमच्याही काळात आत्महत्या व्हायच्या. मात्र, आम्ही आत्महत्येची कारणे शोधून देशभरातील शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी केली होती. त्यात नाशिक जिल्ह्याला 800 कोटींची कर्जमाफी मिळाली होती. फळबागा योजनेतून 650 कोटी रुपयांची मदत शेतकर्‍यांना केली होती. 

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी येऊन गेले मात्र कर्जमाफीवर काहीही बोलले नाहीत. शेतीवर काही बोलले नाहीत, तरीही मग ते मतांचा जोगवा मागत आहेत. शेतमालाला भाव नाही, कांदाप्रश्‍न, शेतकरी आत्महत्या यावर चकार शब्दही मोदी बोलले नाहीत, असे सांगून पवार म्हणाले, मोदी आतापर्यंत राज्यात सातवेळा येऊन गेले. पण, बेरोजगारी, पाणी, औद्योगिकीकरण यावर काहीही बोलले नाहीत. 
ते फक्‍त गांधी परिवाराने काय केले असे विचारत असतात.  इंदिरा गांधींनी गरिबांच्या हिताची जपणूक केली. पाकिस्तानचे दोन तुकडे करून झाशीच्या राणीची परंपरा जपली. राजीव गांधींनी आधुनिक तंत्रज्ञान आणले, असेही पवार म्हणाले.