Fri, Jul 10, 2020 22:58होमपेज › Nashik › सारंगखेड्यात उभारणार अश्‍वसंग्रहालय : मुख्यमंत्री

सारंगखेड्यात उभारणार अश्‍वसंग्रहालय : मुख्यमंत्री

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 09 2017 1:37AM

बुकमार्क करा

नंदुरबार : प्रतिनिधी

तीनशे वर्षांची परंपरा असलेला सारंगखेड्याचा यात्रोत्सव आणि अश्‍व बाजार आगामी काळात पर्यटकांचे आकर्षण ठरणार असून, अश्‍वसंग्रहालय देश-विदेशांतील अश्‍वप्रेमींच्या केंद्रस्थानी राहील. त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करून रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सारंगखेडा, ता. शहादा येथील चेतक फेस्टिव्हल येथे जागतिक दर्जाच्या अश्‍वसंग्रहालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा. डॉ. हीना गावित, आ. डॉ. विजयकुमार गावित, चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपाल रावल, जि. प. सदस्या ऐश्‍वर्या रावल, सरपंच भारती कोळी, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापक आशुतोष राठोड, महाव्यवस्थापक स्वाती काळे, विक्रांत रावल, रेखा चौधरी आदी उपस्थित होते

घोड्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती, त्यांचे ब्रीडिंग यासह विविध गोष्टी पर्यटकांना समजतील. त्यामुळे येथे घोडा विकास व संशोधन केंद्र, पशुचिकित्सालय कार्यान्वित करण्याबाबतही विचार सुरू आहे. पर्यटन हा सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय आहे. या व्यवसायातून सामान्यातील सामान्य माणसाला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.