Fri, Oct 30, 2020 18:16होमपेज › Nashik › नाशिक : महासभा चालली तब्बल सहा तास !

नाशिक : महासभा चालली तब्बल सहा तास !

Last Updated: May 29 2020 11:04PM

नाशिक : ऑनलाइन महासभेचे कामकाज पाहताना महापौर सतीश कुलकर्णी. समवेत पदाधिकारी.नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोरोना महामारीने सर्वच क्षेत्रात विविध प्रकारची उलथापालथ घडवून आणली आहे. यामुळे अनेक उद्योग क्षेत्र तसेच शासकीय, निमशासकीय आस्थापनांनाही आपापल्या कामकाजात मोठे बदल घडवून आणावे लागत आहे. त्याला नाशिक महापालिकाही अपवाद नाही. महापालिकेच्या 25 वर्षांच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना घडली. ती म्हणजे महापालिकेच्या संपूर्ण महासभेचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने शुक्रवारी तब्बल सहा तास चालले. काही तांत्रिक कारणे वगळता महासभा यशस्वीही झाली. 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या अशा प्रकारच्या पहिल्याच ऑनलाइन महासभेत तब्बल 122 नगरसेवकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे याआधी महापालिकेच्या सभागृहात झालेल्या महासभांना क्‍वचितच इतक्या मोठ्या प्रमाणावर नगरसेवकांनी सहभाग घेतला असावा. अनेक महासभांना तर नगरसेवक केवळ स्वाक्षरी करून हजेरी लावत असतात. परंतु, ऑनलाइन महासभा असल्यामुळे उत्सुकतेपोटी 127 पैकी 122 नगरसेवकांनी ऑनलाइन सहभाग घेत एकप्रकारे रेकॉर्डच केले आहे. गेल्या 20 मे रोजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी कालिदास कलामंदिरात महासभा घेण्याबाबत नगरसचिव विभागाला कळविले होते. त्यानुसार त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे महासभेसाठी परवानगी मागितली होती. त्यावर जिल्हा प्रशासनाने कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करण्याची सूचना करत महापालिकेच्या स्तरावरच महासभेचा निर्णय घेण्याबाबत कळविले होते. एकूणच स्थिती पाहता महापौर कुलकर्णी यांनी महासभेच्या दोन दिवस आधीच महासभा स्थगित करण्याबाबत पत्र दिले. यामुळे महासभा झाली नाही. मात्र, कायद्यातील तरतुदीनुसार सलग दोन महासभा घेतल्या नाही तर महापौर व उपमहापौर पदावर गंडांतर येऊ शकते, या काळजीपोटी सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील यांनी ऑनलाइन महासभा घेण्याचा निर्णय घेतला आणि तसे नगरसचिव राजू कुटे यांना सांगितले. त्यानुसार कुटे व त्यांच्या सहकार्‍यांनी याबाबत तयारी करत प्रशासनातील यांत्रिकी व संगणक विभागाच्या सहकार्याने ऑनलाइन महासभेचा सूर जुळवून आणला. 

एरवी दहा ते बारा तास चालणारी महासभा सहा तास चालली तीही ऑनलाइन असताना. यामुळे या बाबीचेही कौतुक होत आहे. महासभेत 120 नगरसेवकांसह सर्वच खातेप्रमुख आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. 120 नगरसेवकांपैकी जवळपास 40 ते 45 नगरसेवकांसह त्या-त्या पक्षांच्या गटनेत्यांनी चर्चेत सहभाग घेत विविध प्रकारच्या सूचनांसह आपापल्या प्रभागातील विकासकामांविषयी म्हणणे सादर केले. प्रत्येक नगरसेवकास महासभेसाठी लिंक पाठविण्यात आली होती. मायक्रोसॉफ्ट टीम नावाच्याा अ‍ॅपच्या माध्यमातून महासभा झाली. गटनेते वगळता बहुतांश नगरसेवकांनी आपापल्या घरूनच महासभेत सहभाग घेतला.  

 "