Fri, Jun 05, 2020 17:14
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नंदूरबार : भाजप-काँग्रेसमध्ये काट्याची टक्‍कर

नंदूरबार : भाजप-काँग्रेसमध्ये काट्याची टक्‍कर

Published On: Feb 23 2019 1:38AM | Last Updated: Feb 23 2019 1:38AM
योगेंद्र जोशी

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने आजवर येथे आदिवासी लोकप्रतिनिधी निवडून येत आहे. 1980 ते 2014 अखेर माणिकराव गावित हेच खासदार होते. सातव्या लोकसभेपासून ते पंधराव्या लोकसभेपर्यंत सलग नऊ वेळा ते निवडून आले. 1994 मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या डॉ. विजयकुमार गावित यांनी टप्प्याटप्प्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढले.

सन 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस व भाजप यांच्यात मुख्य लढत होती. भाजपने मोदी लाटेमुळे विजय मिळवत काँग्रेसला मोठा धक्‍का दिला. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले तत्कालीन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हीना गावित या भाजपच्या तिकिटावर एक लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आल्या. डॉ. हीना गावित यांना 5 लाख 79 हजार 486, तर माणिकराव गावित यांना 4 लाख 72 हजार 581 मते मिळाली होती. नंदुरबार मतदारसंघात इतिहासात प्रथमच भाजपचा उमेदवार विजयी झाला. या पार्श्‍वभूमीवर यंदा भाजपपुढे हा मतदारसंघ राखण्याचे, तर पूर्वीचे वर्चस्व पुनर्स्थापित करण्याचे काँग्रेसपुढे आव्हान राहणार आहे. 

विधानसभानिहाय स्थिती 

मतदारसंघात अक्‍कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, साक्री आणि शिरपूर या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पैकी अक्‍कलकुवा, नवापूर, शिरपूर आणि साक्री अशा 4 ठिकाणी काँग्रेसचे; तर तळोदा-शहादा व नंदुरबार येथे भाजपचे आमदार आहेत. पक्ष म्हणून भाजपचे संघटन मजबूत नसले, तरी डॉ. विजयकुमार गावित यांचे लोकसंपर्काचे जाळेे भक्‍कम आहे. त्याचा लाभ हीना यांना होईल, असे दिसते.

बलस्थाने व कमकुवत बाजू 

चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार पटकावत दमदार कामगिरी केली असल्याने भाजपतर्फे हीना गावित याच पुन्हा उमेदवार राहतील, हे स्पष्ट आहेे; तर सलग 6 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार के. सी. पाडवी यांचा स्वच्छ चेहरा काँग्रेसकडून पुढे करण्यात आला आहे. हीना गावित यांच्याशी अद्याप तरी पक्षांतर्गत स्पर्धा नाही. मात्र, त्यांच्यापुढे गेल्या निवडणुकीप्रमाणे मताधिक्याने निवडून येण्याचे आव्हान उभे आहे. मोदी लाट त्यांच्या सोबतीला नाही. शिवाय हीना यांना भाजपच्या जिल्हाध्यक्षा म्हणून भाजपचे मूळ कार्यकर्ते व राष्ट्रवादीतून भाजपत आलेले कार्यकर्ते यांची सांगड घालण्यात यश आलेले नाही. तळोदा-शहादा मतदारसंघाचे भाजप आमदार उदेसिंग पाडवी हे गावित परिवाराविरोधात जाहीर वक्‍तव्ये करीत आले आहेत. भाजपतील ही गटबाजी हीना यांना त्रासदायक ठरणार आहे. वर्षभरापूर्वी दिग्विजय सिंग नर्मदा परिक्रमेनिमित्त नंदुरबारमध्ये आले असताना, त्यांनी पाडवी यांच्या उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब केले होते. अमरीशभाई पटेल, आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक, माणिकराव गावित यांच्यासारखे नेते आणि प्रत्येक तालुक्यातील युवा कार्यकर्ते पाठीशी असणे हे त्यांचे बलस्थान आहे. उमेदवारीसाठी त्यांना स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. माजी मंत्री पद्माकर वळवी आणि माजी खासदार माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांची नावेही पक्षाच्या विचाराधीन आहेत. 

प्रियांका अस्त्र चालणार? 

प्रियांका गांधी यांची पहिली प्रचारसभा नंदुरबार जिल्ह्यात घेण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी सुरू केला आहे. तसे झाल्यास नंदुरबार मतदारसंघ यंदाही देशाचे लक्ष वेधून घेईल. यापूर्वीही इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नंदुरबार येथील जाहीर सभांनी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ झाला होता. सोनिया आणि राहुल गांधी यांच्या सभाही होत आल्या आहेत. परंतु, एकेकाळी ‘इंदिरामाय’चा परमभक्‍त असलेला आदिवासी समूह आता काँग्रेसप्रेमी राहिलेला नाही, हेेेे अलीकडे अनेकदा सिद्ध झाले आहे. यामुळे काँग्रेसचे प्रियांका अस्त्र मतदारसंघात काय परिणाम घडवणार, ढासळलेला काँग्रेसचा बालेकिल्ला प्रियांका आणि राहुलच्या मदतीने पुन्हा उभारला जातो का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. भाजपकडून मतदारसंघातील विकासकामे सांगण्यावर भर दिला जात आहे. काँग्रेसने मात्र राफेलसारख्या देशपातळीवरील विषयापासून दुर्गम भागांतील शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्यांपर्यंतची उणी बाजू मांडणे, तसेच शेतकरी, आदिवासी विद्यार्थी व मजुरांच्या बेरोजगारीशी संबंधित वातावरण तापवणे सुरू ठेवले आहे. 

2014 ची लोकसभा निवडणूक 

डॉ. हीना गावित,  भाजप                5,79,486

माणिकराव गावित, काँग्रेस            4,72,581

एकूण मतदार :                             16 लाख 45 हजार 449

नवमतदार :                                  32 हजार 554