Mon, Sep 21, 2020 17:30होमपेज › Nashik › वकील परिषद आजपासून

वकील परिषद आजपासून

Last Updated: Feb 14 2020 11:58PM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील जिल्हा न्यायालयाच्या आवारात दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषदेला शनिवार (दि.15) पासून सुरुवात होत आहे. परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे. तर रविवारी (दि.16) जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

दोनदिवसीय वकील परिषदेसाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती भूषण गवई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परिषदेत सॉलिसीटर जनरल अ‍ॅड. तुषार मेहता, अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अ‍ॅड. अनिल सिंग, अ‍ॅड. ए. एन. एस. नाडकर्णी, अ‍ॅडव्होकेट जनरल अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष अ‍ॅड. मननकुमार मिश्रा, ज्येष्ठ वकील अ‍ॅड. शेखर नाफडे, अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी आदी मार्गदर्शन करणार आहेत.

परिषदेसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहनमंत्री अनिल परब, कृषिमंत्री दादा भुसे, महापौर सतीश कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत. परिषद यशस्वीतेसाठी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, वकील परिषदेचे समन्वयक अ‍ॅड. जयंत जायभावे आदींच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. 

विविध विषयांवर चर्चा
दोनदिवसीय वकील परिषदेत विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘जलद न्यायदान हा पक्षकाराचा मूलभूत अधिकार- अंमलबजावणीसाठीची माध्यमे व उपाय’, ‘सर्वोच्च न्यायालय ते जिल्हा पातळीवर न्यायालयाचे विकेंद्रीकरण ही काळाची गरज’, ‘सक्षम, प्रभावी आणि मोफत कायदा सहाय्य- मूलभूत अधिकार’, ‘वकिली व्यवसायापुढील नवीन आव्हाने आणि उपाय’ आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

यजमान म्हणून चांगले नियोजन करा : भुजबळ
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दोनदिवसीय वकील महोत्सवासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे उपस्थित राहणार आहेत. सरन्यायाधीश बोबडे यांच्या रूपाने जिल्हा न्यायालयाच्या 135 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नाशिकमध्ये येत आहेत. तसेच महाराष्ट्र-गोवा राज्यातूनही मोठ्या प्रमाणात वकील येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर यजमान म्हणून चांगले नियोजन करण्याची सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

जिल्हा न्यायालयाच्या आवारात होणार्‍या राज्यस्तरीय वकील परिषदेच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि.14) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, माजी आमदार जयंत जाधव, आनंद सोनवणे, मनपा शहर अभियंता संजय घुगे, आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे आदींसह बार असोसिएशनचे पदाधिकारी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा न्यायालयाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयालाही हेरिटेज वास्तूचा दर्जा मिळाला आहे. मात्र, काळाची गरज ओळखून नव्या इमारती बांधणे आवश्यक आहे. हेरिटेज वारसा टिकवितानाच नव्या इमारतींसाठी संबंधित विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. 

स्मार्ट रोड आजपासून  दोन दिवस बंद
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
 जिल्हा न्यायालयाच्या आवारात शनिवारी (दि.15) व रविवारी (दि.16) राज्यस्तरीय वकील परिषद होत आहे. या  कार्यक्रमामुळे  सुरक्षा व संभाव्य वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर सीबीएस ते  मेहेर सिग्नलपर्यंत स्मार्ट रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

शनिवारी (दि. 15) दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत आणि रविवारी (दि. 16) सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सीबीएस ते मेहेर चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस दोन्ही बाजूने प्रवेश बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणासाठी सीबीएस ते मेहेर चौकादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

सीबीएस ते मेहेर या मार्गावरील वाहने सीबीएस चौकाकडून डाव्या बाजूकडे वळण घेऊन टिळकवाडी सिग्नलमार्गे इतरत्र जातील. तसेच पर्यायी मार्गाचा वापर करतील. मेहेर सिग्नलकडून येणारी वाहतूक डाव्या बाजूने वळून एमजीरोडकडून सांगली बँक सिग्नलमार्गे इतरत्र जाईल. तसेच इतर पर्यायी मार्गांचा वापर करतील. वाहतूक मार्गातील बदल लक्षात घेऊन नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहनपोलीस प्रशासनाकडून करण्यात  आले आहे.

 "