होमपेज › Nashik › पतसंस्था फेडरेशन, ‘स्वाभिमानी’ची धडक

पतसंस्था फेडरेशन, ‘स्वाभिमानी’ची धडक

Published On: Jul 16 2019 1:59AM | Last Updated: Jul 16 2019 1:59AM
नाशिक : प्रतिनिधी

राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने 300 कोटी रुपयांच्या ठेवी देण्याच्या मागणीसाठी तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतजमीन लिलावाविरोधात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर धडक दिली. फेडरेशन आणि संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी इमारतीच्या आवारातच ठिय्या मांडून कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वाद विभागीय सहनिबंधकांच्या कोर्टात पोहोचला.

नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर जिल्हा बँक आर्थिक संकटात सापडली.जिल्ह्यातील नागरी तसेच बिगर शेती पतसंस्थांचे 250 ते 300 कोटी रुपये या बँकेत अडकले आहेत. त्यामुळे पतसंस्थांना दैनंदिन कामकाज करतानाही अडचणी येऊ लागल्या आहेत. दैनंदिन रोखता रक्कम अडकल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरलतेअभावी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळेच पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांनी बँकेच्या जुन्या इमारतीतील कार्यालयावर मोर्चा काढला. या ठिकाणी धरणे धरण्यात आली. फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंतराव लोढा, कार्याध्यक्ष गोपाळ पाटील, संचालिका अ‍ॅड. अंजली पाटील, जिल्हा पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मधुकर भालेराव, नंदकुमार खैरनार, नरेंद्र बागडे, दिलीप गोगड, प्रकाश गवळी, निशिगंधा मोगल आदी सहभागी झाले होते. त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही बँकेवर धडक दिली.