Wed, Jun 03, 2020 09:39होमपेज › Nashik › मनपाच्या भूखंडांचे सर्वेक्षण 

मनपाच्या भूखंडांचे सर्वेक्षण 

Last Updated: Oct 15 2019 1:12AM
नाशिक : प्रतिनिधी

महापालिकेच्या मालकीच्या सर्वच भूखंडांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मनपा आयुक्‍त राधाकृष्ण गमे यांनी नगर रचना विभागाला दिले आहेत. शहरात महापालिकेचे अनेक भूखंड असून, बर्‍याचशा भूखंडांवर शहरातील काही बिल्डर्स, लोकप्रतिनिधी आणि व्यावसायिकांचा ताबा आहे. यामुळे संबंधित भूखंड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी तसेच सर्वच मिळकतींची नोंद अद्ययावत करण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण होणार आहे. 

सोमवारी (दि.14) खातेप्रमुखांच्या झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात मनपाच्या मालकीच्या भूखंडांविषयी असलेल्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होऊन त्यासाठी तत्काळ पथकाची नेमणूक करून माहिती संकलित करून सादर करण्याचे आदेश आयुक्‍त गमे यांनी दिले आहेत. शहरात महापालिकेच्या विविध प्रकारच्या 900 हून अधिक मिळकती आहेत. यात भूखंडांचाही सहभाग आहे. बहुतांश भूखंड हे शहरातील काही सामाजिक, सेवाभावी, धार्मिक, क्रीडा आणि शैक्षणिक संस्थांच्या ताब्यात आहेत. तसेच अनेक भूखंड बेवारस स्थितीत असल्याने त्यावर अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे होण्याची भीती आहे. आज मनपा प्रशासनाचे लक्ष नसल्याने काही भूखंडांवर अतिक्रमणही झालेले आहे. अनेकांनी तर बंगल्याचा दरवाजा आणि मोकळ्या भूखंडाचे प्रवेशद्वार यांनाच एकत्रित केले आहे. यामुळे हा सर्व प्रकार थांबण्यासाठी आणि मोकळी मैदाने सुरक्षित रहावी या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे आयुक्‍त गमे यांनी सांगितले. त्यानुसार नगर रचना विभागाला आदेशित करण्यात आले असून, 1980 पासूनची माहिती घेण्यास नगर रचना विभागाला सांगितले आहे. 

सर्वेक्षण करण्यात येणार्‍या भूखंडाची सध्याची स्थिती काय आहे. भूखंड कुणाच्या ताब्यात व किती वर्षापासून आहे. भूखंडाचा वापर कशासाठी केला जात आहे. त्यावर 10 ते 15 टक्के यापैकी किती बांधकाम झाले आहे, कशा प्रकारचे बांधकाम झाले आहे आणि त्याचा वापर कशासाठी केला जात आहे अशा विविध स्वरूपाची माहिती संकलित केली जाणार आहे.