Fri, Jun 05, 2020 13:48होमपेज › Nashik › निसाका चालविण्यास घेणार्‍या ‘साईकृपा’वर जप्तीची नामुष्की

निसाका चालविण्यास घेणार्‍या ‘साईकृपा’वर जप्तीची नामुष्की

Published On: Sep 27 2019 2:15AM | Last Updated: Sep 26 2019 11:30PM
नाशिक : प्रतिनिधी
निफाड सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेण्यासाठी जो साखर कारखाना तयार झाला, त्या देवदैठण (ता.श्रीगोंदा) येथील साईकृपा कारखान्यावर साखर आयुक्‍तांनी नुकतीच जप्तीची कारवाई केल्याची बाब समोर आली आहे. अशा कारखान्याच्या ताब्यात निफाड कारखाना देण्याचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निर्णय वादात सापडण्याची शक्यता आहे. 

निफाड आणि नाशिक या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांकडे जिल्हा बँकेचे जवळपास सव्वादोनशे कोटी रुपयांचे कर्ज थकल्याने या दोन्ही कारखान्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कारखाने भाडेतत्त्वावर चालविण्यास देऊन त्यातून कर्जाची वसुली करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. त्यानुसार निफाड कारखाना चालविण्यास घेण्यासाठी देवदैठण येथील साईकृपा या खासगी कारखान्याने तयारी दर्शविली आहे. पण, याच साईकृपा कारखान्यावर जप्तीची नामुष्की ओढवली आहे. साईकृपाने ऊस उत्पादकांचे एफआरपीचे तीन कोटी एक लाख 56 हजार रुपये थकविले असून, या प्रकरणी साखर आयुक्‍तशेखर गायकवाड यांनी जप्तीची कारवाई केली आहे. आता याच ‘साईकृपा’ला निफाड कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी जिल्हा बँकेचा आटापिटा सुरू आहे. 15 वर्षे मुदतीचा करार करण्याचे काम सध्या सुरू आहे. बँकेने निफाड कारखान्याचा थकलेला विक्रीकर भरण्यासाठी विक्रीकर विभागाकडून सवलत मिळवून करारातील अडथळा दूर केला आहे.

जे स्वत:च आरोपीच्या पिंजर्‍यात उभे आहे, त्या ‘साईकृपा’ला निफाड कारखाना चालविण्यास देण्याचा बँकेचा निर्णय कितपत योग्य, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. ऊस उत्पादकांचे पैसे बुडविणारा हा ‘साईकृपा’ जिल्हा बँकेला निफाड कारखान्याचे भाडे नियमितपणे देण्याविषयी साशंकता व्यक्‍त केली जात आहे. यासंदर्भात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.