Fri, May 29, 2020 08:44होमपेज › Nashik › जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव रोखण्यात यश

जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव रोखण्यात यश

Last Updated: Oct 16 2019 10:56PM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही डेंग्यूचा फैलाव झाला असला तरी त्याचा यशस्वी सामना करण्यास जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला यश आले आहे. दहा महिन्यांत 618 रुग्णांना लागण झाली असली तरी हे सर्वच रुग्ण या आजारातून बरे झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

ज्याप्रमाणे स्वाइन फ्लूला अटकाव करण्यात आरोग्य विभागाला यश आले, त्याप्रमाणे डेंग्यूचाही प्रादुर्भाव रोखण्यास यश आल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये एकूण 2,218 जणांचे रक्त नमुने  तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात प्रत्यक्षात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 628 इतकी होती. तर संपूर्ण वर्षभरात दोघांचा मृत्यू झाला होता. काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. पण, जोपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत त्यांची चाचणी होत नाही, तोपर्यंत त्यांना डेंग्यू झाला, असे म्हणता येत नाही. या संपूर्ण वर्षात 628 रुग्णांचा यात समावेश होता आणि त्यांना डेंग्यू झाल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले होते. तर दोघा रुग्णांचा यात मृत्यू झाला होता. चालू वर्षात म्हणजे सप्टेंबरपर्यंत 1,808 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. त्यात 509 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच 1 ते 18 ऑक्टोबरपर्यंत 379 रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले. तर 109 जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. दोन वर्षात या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या पाहता त्यात फारसा बदल झाला नसल्याचे दिसून येते. चालू वर्षात आतापर्यंत एकही या आजाराची बळी नाही, हे जमेची बाजू ठरली आहे.

हिवाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव अधिक

नाशिक तालुक्यात जानेवारी महिन्यात एक रुग्ण आढळल्यानंतर जुलैत एक ऑगस्टमध्ये  पाच आणि सप्टेंबरमध्ये सात असे 12 रुग्ण आढळले. सिन्नरमध्ये जानेवारीत एक जुलैत एक, ऑगस्टमध्ये चार आणि सप्टेंबरमध्ये  नऊ असे एकूण रुग्ण आढळले म्हणजे या दोन तालुक्यात फेब्रुवारी ते जून या दरम्यान डेंग्यू नव्हताच. दुसरीकडे नांदगाव, मालेगाव, निफाड, येवला, चांदवड, देवळा, कळवण, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी या तालुक्यांमध्ये मात्र जानेवारी ते जुलै या दरम्यान डेंग्यूचा मागमूसही नव्हता. म्हणजे, दरम्यानच्या सात महिन्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. म्हणजे उन्हाळ्यात सुप्त असलेले डेेंग्यू हिवाळ्यातच डोके वर काढत असल्याचेही ही आकडेवारी सांगते.