Fri, Jun 05, 2020 16:05
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › फूलविक्रेत्यांचे पुनर्वसन करा

फूलविक्रेत्यांचे पुनर्वसन करा

Last Updated: Oct 16 2019 10:53PM
नाशिक : प्रतिनिधी

गणेशवाडीतील भाजीविक्रेत्यांसाठी बांधलेले मार्केट सध्या पडून असून, तेथे फूलविक्रेत्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी सराफ बाजारातील फूलविक्रेत्यांनी मनपा आयुक्‍तराधाकृष्ण गमे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

गणेशवाडी येथील भाजी मार्केट गेल्या 15 वर्षांपासून पडून आहे. या ठिकाणी भाजीविक्रेते जाण्यास तयार नाहीत, अशी परिस्थिती असताना मनपाने फूलविक्रेत्यांना सराफ बाजारातून उठवून त्यांना गणेशवाडी मार्केटच्या पार्किंगची जागा देऊ केली आहे. मात्र, ही पार्किंगची जागा अतिशय लहान असून, ही जागा फूलविक्रेत्यांना दिल्यास पार्किंगचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे भविष्यात वादविवाद होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शिवाय समोरच आयुर्वेद रुग्णालय आहे. 

शेजारी मुख्य रस्ता असून, वाहतुकीलाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. फूलविक्रेत्यांचा स्थलांतरास विरोध नाही. फक्‍त योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे, एवढीच फूलविक्रेत्यांची अपेक्षा आहे. यापूर्वीदेखील विक्रेत्यांच्या स्थलांतराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यावेळचे मनपा आयुक्‍त आणि पालकमंत्री यांच्या मध्यस्थीने कायमस्वरूपी जागा मिळेपर्यंत फूलविक्रेत्यांना आहे तेथेच बसू द्यावे, असा निर्णय झालेला होता. असे असतानाही फूलविक्रेत्यांचे अतिक्रमण हटवून त्यांच्या मालाचे अतिक्रमण पथकाकडून नुकसान केले जात आहे. या विक्रेत्यांना उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेच साधन नसल्याने त्यांचे योग्य जागेत पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी फूलविक्रेत्यांनी केली आहे. 

निवेदनावर नाशिक जिल्हा फूल मार्केटचे अध्यक्ष संदीप शिंदे, कल्पेश रासकर, हिराबाई भाबड, सोमनाथ गाडे, भारत उडान, आकाश धारणे, योगेश शिरसाठ, गणेश डोके, सदाशिव उडान यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.