Fri, Jun 05, 2020 17:51होमपेज › Nashik › सावाना इमारतीचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

सावाना इमारतीचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

Published On: Sep 03 2019 1:45AM | Last Updated: Sep 02 2019 10:27PM
नाशिक : प्रतिनिधी

येथील सार्वजनिक वाचनालयाच्या संपूर्ण वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे कार्यकारिणीने ठरवले असून, त्यानंतर वास्तूचे नूतनीकरण वा नव्याने बांधकाम करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या वास्तूला बरीच वर्षे झाली असून, त्यातील विशेषत: परशुराम साईखेडकर नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. नाट्यगृहातील रंगमंच, पंखे, खुर्च्या, दरवाजे, ग्रीन रूम आदी अनेक बाबींबाबत कलावंत व रसिकांच्या तक्रारी आहेत. त्या लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वी नाट्यगृहाचे काही काम करण्यात आले. मात्र, त्यानंतरही नाट्यगृहाबाबतच्या तक्रारी कमी होऊ शकलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर नाट्यगृहाबाबत कोणत्या ठोस उपाययोजना करता येतील, याची पदाधिकार्‍यांनी चाचपणी सुरू केली.

शेजारच्या यशवंत व्यायामशाळेसाठी निधी उपलब्ध करून देणार्‍या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्याशीही संपर्क साधण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वास्तुविशारदाने नाट्यगृहाच्या वास्तूची पाहणी केली. मात्र, सभागृहाची बिकट अवस्था पाहता, त्यांनी आधी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करवून घेण्याचा सल्ला सावाना पदाधिकार्‍यांना दिला. त्यामुळे सावानाने त्यासाठी सूचना प्रसिद्ध केली असून, निविदा मागविण्यात आल्या आहेत.  दरम्यान, स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा वा संपूर्ण नव्या बांधकामाचा निर्णय घेतला जाणार आहे. नव्या बांधकामाला सुमारे 25 कोटी रुपयांचा खर्च असून, एवढा निधी कोठून उभारणार, असा प्रश्न कार्यकारिणीपुढे आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने काम करण्याचाही पर्याय समोर आहे. 
मात्र, स्ट्रक्चरल ऑडिटनंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय नाट्यगृहाच्या आवारातील उपाहारगृह बंद पडले असून, त्याचा ठेकाही नव्याने दिला जाणार आहे.