Sat, Jul 11, 2020 09:49होमपेज › Nashik › नाशिकमध्ये कठोर लॉकडाऊन

नाशिकमध्ये कठोर लॉकडाऊन

Last Updated: Jul 01 2020 8:06AM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लॉकडाऊन उठविल्यानंतर नागरिकांमधील निष्काळजीपणा वाढला आहे. विशेषत: युवावर्ग विनाकारण रस्त्यावर फिरत आहे. परिणामी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाशिक शहरातील लॉकडाऊन अधिक कडक करण्यात येणार आहे. सायंकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. तसेच खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करण्याचे आदेश त्यांनी यंत्रणांना दिले.  

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा मंगळवारी (दि.30) पालकमंत्री भुजबळ यांनी आढावा घेतला. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, बाहेरून आलेल्यांमुळे जिल्ह्यात कोरोेनाचा फैलाव वाढला आहे. कोरोनाने आतापर्यंत जिल्ह्यात 236 बळी घेतले असून, मृत पावलेल्या 36 व्यक्ती या 40 ते 45 वयोगटापर्यंतच्या आहेत. बाधितांची संख्या वाढत असतानादेखील नाशिककर मात्र आजही बेफिकीरपणे वावरत आहे. त्यातही विनाकारण रस्त्यावर वावरणार्‍यांमध्ये युवकांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे लॉकडाऊन पुन्हा एकदा कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. सायंकाळी सात ते पहाटे पाच या वेळेत विनाकारण  रस्त्यावर फिरणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान,  खासगी रुग्णालयांकडून होणार्‍या रुग्णांच्या आर्थिक लुटीसंदर्भात कारवाईचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना असल्याचे ना. भुजबळ यांनी स्पष्ट केले. खासगी रुग्णालयांच्या बेडचे नियोजन हे संबंधित रुग्णालय प्रशासनाने नव्हे, तर यंत्रणांमधील अधिकार्‍यांनी करावे, असे स्पष्ट निर्देश भुजबळांनी दिले.

दोन ते तीन रुग्णालये मिळून एका अधिकार्‍याची नेमणूक करावी. संबंधित अधिकारी कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालयांमधील भरती करण्यापासून ते इतर सर्व सेवांचे नियोजन करेल. खासगी डॉक्टर्सला सामाजिक बांधिलकीतून कोविड-19 सेवा देण्यासाठी पत्र देऊनही ते पुढे येत नाहीत. त्यामुळे येथून पुढे कायद्याने अशा डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफच्या सेवा अधिग्रहीत करण्यात येतील, असे  भुजबळांनी सांगितले. कोविड केअर केंद्रांत लागणार्‍या अन्नपदार्थापासून ते इतर साहित्यासाठी खासगी कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून निधी द्यावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले. दरम्यान, वाढीव वीजबिल हा राज्यभराचा प्रश्न झाला आहे. या प्रश्नावर मंत्रिमंडळ बैठकीत तसेच ऊर्जामंर्त्यांशी संपर्क साधत मुद्दा मांडणार असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

ही उद्यासाठीची तयारी 

येवल्यातील नगरसूलमध्येही 25 बेड्सच्या कोविड केंद्राला आधी विरोध झाला. आता मात्र तेथील परिस्थिती सामान्य असल्याचे सांगतानाच नाशिकमध्ये 200 ते 300 रुग्णालये हे रहिवासी इमारतीत आहेत. या रुग्णालयांमध्ये विविध आजारांच्या रुग्णांचा सातत्याने वावर असतो. तेथे रुग्णालयांना विरोध होत नसल्याचे भुजबळ म्हणाले. ठक्कर डोम केंद्राकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहावे. तूर्तास या केंद्रांची गरज भासणार नसून खबरदारी म्हणून भविष्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.