Tue, Jun 02, 2020 23:08होमपेज › Nashik › कांदा उत्पादकांचा सटाण्यात रास्ता रोको

कांदा उत्पादकांचा सटाण्यात रास्ता रोको

Published On: Sep 25 2019 1:48AM | Last Updated: Sep 25 2019 1:48AM
सटाणा : वार्ताहर

कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळत असताना मंगळवारी (दि.24) येथील बाजार समितीत दुपारनंतर अचानक कांदा लिलाव बंद झाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी सायंकाळच्या सुमारास बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन छेडले. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर एक तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सद्यस्थितीत कांद्याला संपूर्ण देशभरातून मागणी वाढली आहे. सरासरी तीन हजारांच्या आसपास दर मिळत असल्याने कांदा उत्पादक समाधानी आहेत. जिल्ह्याच्या तुलनेत येथील बाजार समितीत सर्वाधिक आवक सुरू आहे. काही महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेला कांदा बाजारात येत आहे. शनिवार, रविवारी सुट्टी असताना सोमवारीही (दि.23) येथील बाजार समितीचे लिलाव बंद होते. त्यामुळे तीन दिवसांपासून साचून राहिलेली आवक मंगळवारी(दि.24)अचानक वाढली. यामुळे बाजार समितीत 800 हून अधिक  वाहनांची आवक झाली. सकाळच्या सत्रात  लिलाव व्यवस्थित पार पडले. परंतु, दुपारच्या सत्रात लिलाव सुरू झाल्यानंतर काही वेळातच व्यापार्‍यांनी लिलाव थांबवले. काही तासानंतर पुन्हा लिलाव सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी  समाधानाचा सुस्कारा सोडला. परंतु, तोच पुन्हा लिलाव बंद झाले आणि पाठोपाठ पावसाचेही आगमन झाले.

यामुळे निम्म्याहून अधिक वाहनांचा लिलाव होऊ शकला नाही. बुधवारी (दि.25) माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त बाजार समिती बंद असल्याने लिलावासाठी आणखी दोन दिवसांची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय उरला नाही. यामुळे भावनांचा उद्रेक झालेल्या आक्रमक शेतकर्‍यांनी सायंकाळी अचानक बाजार समिती कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन छेडले. आंदोलनाबाबत समजताच पोलिसांनी दाखल होत शेतकर्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासभर झालेल्या चर्चेनंतर पोलिसांनी शेतकर्‍यांकडून रस्ता मोकळा करून घेत बाजार समितीच्या कार्यालयात चर्चेसाठी बोलाविण्यात आले.

यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी तीव्र भावना व्यक्त करीत बाजार समिती संचालक मंडळ व प्रशासनावर तोंडसुख घेतले. कांद्याला दोन पैसे बाजारभाव मिळताच लिलाव बंद करून उत्पादक आणि ग्राहकांचीसुद्धा मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. परंतु, कुठलाही तोडगा न निघताच अखेर शेतकर्‍यांना माघार घ्यावी लागली. यावेळी लिलावासाठी आलेल्या शेतकर्‍यांसह शहर, परिसरातील शेतकरीही आंदोलनात सहभागी झाले.

ज्यावेळी कांद्याचे दर कमी असतात त्यावेळी सरकारमार्फत एवढी तत्परता का दाखवली जात नाही. आज तीन वर्षांनंतर कांद्याला कुठे चांगले दर मिळत आहे. त्यात केंद्र सरकारमार्फत भाव आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाय केले जात आहे. सरकारने खाणार्‍यांबरोबर पिकवणार्‍या घटकाचाही विचार केला पाहिजे.
- शेखर कदम, शेतकरी, कातरणी

दक्षिणेकडील नवीन कांदा बाजारामध्ये येऊ लागल्याने तसेच कांदा निर्यातीत घट झाली. भावामध्ये काही प्रमाणामध्ये घसरण दिसत आहे.    
 - मनोज जैन, कांदा व्यापारी, लासलगाव

450 रुपयांची कांदा दरात घसरण

लासलगाव : वार्ताहर

केंद्र सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकार्‍यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.20) भेट देऊन जाताच चार दिवसांमध्ये कांद्याच्या सरासरी दरामध्ये 450 रुपयांची घसरण दिसून आली. मंगळवारी येथील मुख्य बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी 3651 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशांतर्गत कांद्याची मागणी वाढल्यामुळे कांद्याचे दर काही दिवसांपासून चार हजार रुपये प्रतिक्विंटलच्या जवळपास होते.

बाजारभाव चांगला असल्याने शेतकर्‍यांचे मागील वर्षी झालेले नुकसान आणि आता झालेला खर्च कुठे तरी भरून निघत असताना केंद्र सरकारने कांदा आयातीचा घेतलेला निर्णय, कांद्यावरील किमान निर्यातमूल्य दरात केलेली वाढ तसेच नाफेडमार्फत खरेदी केलेला कांदा हा शहरी भागात पाठवला. मात्र, असे उपाय करूनदेखील कांद्याचे दर आटोक्यात येत नसल्याचे लक्षात येताच नवी दिल्ली येथून भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकार्‍यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीत तातडीने भेट देऊन एका रात्रीतून एवढी तेजी का आली, यापुढील काळात बाजारभावातील चढ-उतार, सद्य परिस्थितीत उपलब्ध असलेला शिल्लक कांदा, नवीन कांदा पीक केव्हा येणार, कधी येणार अशी सर्व माहिती घेऊन याबाबतचा अहवाल केंद्राला पाठवताच मंगळवारी कांद्याच्या सरासरी दरात 450 रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली. येथील मुख्य बाजार समितीत 694 वाहनांद्वारे कांद्याची आवक होऊन कांद्याला कमीत कमी 1001 सरासरी 3651 जास्तीत जास्त 4179 भाव मिळाले.