Wed, Jun 03, 2020 09:16होमपेज › Nashik › भाजपाचा मुख्यमंत्री होणार

भाजपाचा मुख्यमंत्री होणार

Published On: Jul 16 2019 1:59AM | Last Updated: Jul 16 2019 1:59AM
नाशिक : प्रतिनिधी

राज्यात भाजपा-सेना युती आहे.आगामी विधानसभेत काहीही झाले, तरी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होणार असे सूतोवाच भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी सोमवारी (दि.15) नाशिकमध्ये केले. देशात व राज्यात विरोधी पक्ष निष्प्रभ झाला असून, त्यांनी नवे नेतृत्व लवकर शोधावे, असा टोलाही त्यांंनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला. 

आगामी विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर पांडे यांनी भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पांडे म्हणाल्या, देशात भाजपा सर्वाधिक मजबूत पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत सामान्य जनतेपर्यंत विविध योजना पोहोचवितानाच देशात मजबूत सरकार दिले. त्यामुळे मतदारांनी मोदी यांच्यावर पुन्हा विश्‍वास टाकत भाजपाला स्पष्ट बहुमत दिले. पंतप्रधान मोदी यांच्याप्रमाणेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही चांगले काम करत असून, नागरिकांचा त्यांच्यावर विश्‍वास असल्याचे त्या म्हणाल्या. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे विविध पक्षांमधील लोक भाजपात येण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्या म्हणाल्या, राज्यात शिवसेनेसोबत युती करूनच विधानसभा निवडणूक लढवली जाईल. मात्र, कोणी कितीही कल्पनाविलास केला, तरी राज्यात आगामी मुख्यमंत्री भाजपाचा असेल हे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत. पांडे यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  लोकशाहीत विरोधी पक्ष हा मजबूत असावा लागतो. परंतु, देशात व राज्यात विरोधी पक्ष पूर्णपणे निष्प्रभ ठरल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर निशाणा साधला. दरम्यान, विरोधी पक्षाने नवे नेतृत्व लवकर शोधावे, त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत, अशी खोचक टीकाही पांडे यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली. 

काँग्रेसला नैतिक अधिकार नाही

कर्नाटकमधील सत्ताकारणावरून सुरू असलेल्या संघर्षाबद्दल सरोज पांडे यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. आमदार फोडल्याचा काँग्रेसचा आरोप खोडून काढताना भाजपा कधीही घाणेरडे राजकारण करत नसल्याचे त्या म्हणाल्या. उलट काँग्रेस पक्षालाच त्यांचे लोक सांभाळता येत नसल्याची टीका त्यांनी केली. तसेच ज्या पक्षाला लोक सांभाळता येत नसतील त्यांना आरोप करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे ही त्या म्हणाल्या.