Tue, Nov 19, 2019 02:30होमपेज › Nashik › राज्यातील पर्यटनाला मिळणार गती

राज्यातील पर्यटनाला मिळणार गती

Published On: Aug 28 2019 1:48AM | Last Updated: Aug 27 2019 10:57PM
नाशिक : प्रतिनिधी

सरकारने पर्यटन विभागात फेरबदल केले असून, पर्यटन संचालनालय आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) असे स्वतंत्र विभाग केले आहेत. पर्यटनाशी निगडित विकासकामे व धोरण ठरविण्याचे अधिकार संचालनालयाकडे देण्यात आले आहे. एमटीडीसीकडे केवळ रिसॉर्ट व बुकिंगची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यातील पर्यटनाला गती देणे हा त्यामागील उद्देश आहे.

710 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा, विविधतेत एकता तसेच राकट आणि कणखर देशा अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पर्यटनात वृद्धी झाली आहे. समुद्र किनारे, गडकोट, लेण्या तसेच विविध पर्यटनस्थळांना भेटी देणार्‍यांमध्ये देश-परदेशातील पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. पर्यटनातील संधी आणि रोजगार बघता राज्य सरकारनेदेखील पर्यटनवाढीला प्रोेत्साहन देण्यासाठी पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यानुसार यापूर्वी पर्यटन विभागांतर्गत असलेले संचालनालय व एमटीडीसी हे दोन्ही विभाग स्वतंत्र केले आहेत.

राज्यातील पर्यटनस्थळांचा विकासासह धोरणात्मक निर्णयाची जबाबदारी संचालनालयाकडे असेल. तर एमटीडीसीकडे रिसॉर्ट, न्याहारी व ब्रेड अ‍ॅण्ड ब्रेकफास्ट या सुविधा पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे लागणार आहे.  या दोन्ही विभागांना त्यांच्या जबाबदार्‍या सोपवून देतानाच भविष्यात प्रतिनियुक्तीवर इतर विभागांमधून अधिकारी-कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती मिळते आहे. 

पर्यटन विभागांतर्गत हे दोन्ही विभाग एकत्रित असल्याने एकाच अधिकारी-कर्मचार्‍याला एकाचवेळी दोन जबाबदार्‍या पार पाडाव्या लागत होत्या. परिणामी त्याचा थेट परिणाम राज्यातील पर्यटनवाढीवर होत होता. मात्र, सरकारने आता दोन्ही विभाग स्वतंत्र करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविल्याने राज्यातील पर्यटनाचे रखडलेले प्रस्ताव मार्गी लागण्यास मदत मिळेल. तसेच एमटीडीसीकडून दिल्या जाणार्‍या सुविधांवर लक्ष केंद्रित करता येणार असल्याने पर्यटकांचा विश्वास अधिक वृद्धिंगत होण्यास हातभार लागणार आहे.

सहा विभागांत उपसंचालक

पर्यटन विभागाचे राज्यातील नाशिक, नागपूर, पुणे, अमरावती, औरंगाबाद व कोकण या महसुली विभागांत यापूर्वी एमटीडीसी प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय होते. या कार्यालयांमध्ये प्रादेशिक व्यवस्थापकांसह कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु, नवीन निर्णयानुसार या कार्यालयाचे नाव बदलून उपसंचालक, पर्यटन संचालनालय असे होणार आहे. कोकण विभाग उपसंचालक कार्यालय लवकरच मुंबईतील कोकण भवनमध्ये  कार्यन्वित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

‘एमटीडीसी’त पदनिर्मिती

पर्यटन संचालनालय उपसंचालकाच्या धर्तीवर एमटीडीसीत पर्यटन विकास अधिकारीपदाची निर्मित्ती करण्यात आली आहे. एमटीडीसीचे जेथे-जेथे रिसॉर्ट आहेत, त्या ठिकाणी हे अधिकारी नियुक्त केले जातील. नाशिक विभागात शिर्डी येथे एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. त्यामुळे भविष्यात विभागातील पाचही जिल्ह्यांच्या कारभारावर शिर्डीतून देखरेख ठेवली जाणार आहे.