Tue, Nov 19, 2019 16:30होमपेज › Nashik › सभापती, उपसभापतींवरील ‘अविश्वास’ ठराव मंजूर

सभापती, उपसभापतींवरील ‘अविश्वास’ ठराव मंजूर

Published On: Aug 20 2019 1:46AM | Last Updated: Aug 19 2019 10:53PM
लासलगाव : वार्ताहर

लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर व उपसभापती संदीप दरेकर यांच्यावर सोमवारी (दि.19) अविश्वास ठराव बाजार समितीच्या आवारात 13 विरुद्ध 5 ने मंजूर करण्यात आला. पंढरीनाथ थोरे, नानासाहेब पाटील, राजेंद्र डोखळे यांच्यासह तेरा संचालकांनी दि.9 ऑगस्ट रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधकांनी अविश्वास ठरावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सोमवारी (दि. 19) विशेष बैठक बोलावली होती. त्यापूर्वी शुक्रवारी (दि.16) सभापती जयदत्त होळकर व उपसभापती संदीप दरेकर यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा दिला होता. परंतु, विरोधी गटाच्या संचालकांनी विषयसूचीप्रमाणे ही बैठक घेण्यात यावी, असा आग्रह धरला. बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात झालेल्या या बैठकीस सभापती जयदत्त होळकर, उपसभापती संदीप दरेकर यांच्या गटाचे पाच सदस्य तसेच पंढरीनाथ थोरे यांच्या गटाचे सहा, तर नानासाहेब पाटील यांच्या गटाचे सात सदस्य असे एकूण 18 सदस्य उपस्थित होते.

या वेळी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी घेतलेल्या सभापती व उपसभापती यांच्या विरोधात असलेल्या अविश्वास ठरावाच्या मतदानात 13 संचालकांनी हात वरती करून अविश्वास दाखवला व उर्वरित पाच संचालकांनी सभापती होळकर व उपसभापती दरेकर यांच्या बाजूने विश्वासदर्शक हात वर करून मतदान केले.13 संचालकांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केल्याने बहुमत सिद्ध झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी सभापती व उपसभापती यांच्याविरोधात असलेला अविश्वास ठराव मंजूर केला व पुढील नवीन सभापती व उपसभापती यांची निवडणूक येत्या दहा दिवसांत करण्यात येईल, अशी माहिती दिली.