Mon, Jan 25, 2021 01:12होमपेज › Nashik › स्मार्ट सिटी गोदा प्रकल्प सादरीकरणाकडे पाठ!

स्मार्ट सिटी गोदा प्रकल्प सादरीकरणाकडे पाठ!

Published On: Jan 26 2018 1:17AM | Last Updated: Jan 25 2018 11:23PMनाशिक : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत गोदा प्रकल्पातील विविध विकासकामांचे सादरीकरण स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीमार्फत गुरुवारी (दि.25) करण्यात आले. मात्र, या सादरीकरणाला केवळ बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक उपस्थित राहिल्याने सादरीकरणाचा फियास्को झाला. 

पंचवटी आणि जुने नाशिक या गावठाण भागात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून गोदावरी नदी व परिसरात गोदा प्रकल्प 1 व 2 अंतर्गत सुमारे 500 कोटींची कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात या भागात सुशोभिकरण करण्याचे नियोजन आहे. त्यात वृक्ष लागवड, वॉल फाउंटन, सायकल ट्रॅक, संगीत कारंजा, कोबाल्ट बसविणे, गोदापार्क सुशोभीकरण, अहिल्यादेवी होळकर पुलाखाली यांत्रिकी दरवाजे बसविणे, गोदावरी स्वच्छता, पादचारी मार्ग, होळकर पूल तसेच इतर भागात नदीपात्रावर पाच पूल तयार करणे, उड्डाणपुल यासह विविध कामांचा समावेश आहे. रेट्रो फिटिंग एरियात ही कामे होणार असल्याने त्यास पंचवटी व जुने नाशिक भागातील सर्वच नगरसेवकांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, या सादरीकरणाकडे काही मोजक्या नगरसेवकांव्यतिरिक्‍त कुणीही फिरकले नाही.

सादरीकरणानंतर प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, गटनेते गजानन शेलार आदींसह अधिकारी उपस्थित होते.