Tue, May 26, 2020 12:32होमपेज › Nashik › सरकारी पगारात सिव्हिलमध्ये निवांत झोप

सरकारी पगारात सिव्हिलमध्ये निवांत झोप

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 11:44PMनाशिक : गौरव अहिरे

प्रवेशद्वार सताड उघडे असणे, मोकळ्या जागेत पथार्‍या टाकून ढाराढूर झोपलेले सुरक्षारक्षक, रुग्णसेवा वार्‍यावर सोडून आरामशीर झोप काढणारे डॉक्टर, टेबलावरच मान टाकून झोपलेले प्रशिक्षणार्थी डॉक्टर, रुग्णालयात मोकाट श्‍वानांचा वावर हे चित्र आहे जिल्हा शासकीय रुग्णालयातील! 

ठाणे येथील शासकीय रुग्णालयातून बाळ चोरून नेल्याचा प्रकार ताजा असतानाच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील सुरक्षिततेचा आढावा घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे भरमसाठ पगार घेत रात्रीच्या वेळी जिल्हा रुग्णालयात झोपा काढण्यासाठी डॉक्टर, कर्मचारी येत असल्याने संताप व्यक्‍त केला जात आहे. तसेच, रुग्णालयाची सुरक्षितताही वार्‍यावर असल्याचे उघडकीस आले आहे. 

नाशिकच्या जिल्हा शासकीय  रुग्णालयात 750 रुग्णखाटा असून, विविध महत्वाचे विभाग 24 तास कार्यरत आहेत. रुग्णालयात जिल्हाभरातील विविध प्रकारचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. स्वच्छता, चांगले उपचार मिळत असल्याने शासनाने गतवर्षी 50 लाख रुपयांचा कायाकल्प पुरस्कारही जिल्हा रुग्णालयास प्रदान केला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयीन प्रशासनाची डॉक्टर, कर्मचार्‍यांवरील पकड सैल झाल्याने किंवा दुर्लक्षित झाल्याने रुग्णालयाची व्यवस्था ढासळत असल्याचे चित्र आहे. रात्रीच्या वेळी जिल्हा रुग्णालयाची सुरक्षितता वार्‍यावर आहे.

खासगी ठेकेदाराकडील सुरक्षारक्षक रात्रीच्या वेळी रुग्णालयाचा मुख्य दरवाजा उघडा ठेवून आतील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत अंथरुण टाकून झोपलेले असतात. त्याचप्रमाणे निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांसाठी असलेल्या खोलीत देखील संबंधित डॉक्टर निवांत झोप घेतात. त्यांचा पदभार प्रशिक्षणार्थी डॉक्टर सांभाळत असतात. गंभीर रुग्ण आल्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांना उठवण्यात येत असते. अतिदक्षता विभागतही हेच चित्र पहावयास मिळत असते. प्रशिक्षणार्थी डॉक्टर टेबलावरच मान टाकून झोपलेल्या दिसतात. त्याचप्रमाणे काही कर्मचारी देखील कोणी नसल्याचे पाहून झोप घेत असतात. 

सुरक्षारक्षकही काढतात झोपा

जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षिततेसाठी खासगी कंत्राटदाराकडून सोळा सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहे. मात्र, या सुरक्षा यंत्रणेचा फायदा काहीच होत नसल्याचे चित्र आहे. खासगी ठेकेदारामार्फत नेमलेले सुरक्षारक्षक वाहन तळाची जबाबदारी स्वीकारत धन्यता मानत आहे. तर काही सुरक्षारक्षक फक्‍त मोबाइलमध्ये गेम खेळण्यात व्यस्त असतात. रात्रीच्या वेळी हे सुरक्षारक्षकही झोपलेले असल्याने अनेकदा गर्दी झाल्यास रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच वाहनतळ होते. त्यामुळे रुग्णवाहिका आणण्यासही अडचणी येत असल्याच्या घटना वारंवार उघडकीस आल्या आहेत. त्यातच रुग्णालयाच्या आवारात मोकाट श्‍वानांचा वावर वाढल्याने रुग्णांसह त्यांच्या नातलगांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. 

पोलिसही घेतात विश्रांती

जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षिततसाठी पोलिसांना याठिकाणी स्वतंत्र कक्ष दिलेला असल्याने या कक्षातच रात्रीच्या वेळी पोलीस झोपत असतात. कक्षातच कर्मचार्‍यांचे अंथरुण आणि पांघरून रचल्याचे दिसते. त्यामुळे सरकारी पगारात सरकारी जागेत झोपा काढण्याचे काम संबंधीत डॉक्टर, कर्मचारी आणि पोलिसांच्या पथ्यावर पडत आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणा काही दिवसांपासून बंद होती. मात्र, ही बाब काही दिवसांनी उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने ही यंत्रणा नुकतीच कार्यान्वित केली आहे.

रुग्ण होतात पसार 

रुग्णालयीन प्रशासनाची चोख सुरक्षितता नसल्याने रुग्णालयातून अनेकदा रुग्ण उपचारादरम्यानच पसार होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये तर बाळास जन्म दिल्यानंतर मातांनीही पळ काढल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पगार देऊनही या सुरक्षा रक्षकांकडून रुग्णालयासह रुग्णांची कोणत्या प्रकारे सुरक्षितता केली जात आहे असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.