Wed, Jun 03, 2020 20:53होमपेज › Nashik › बहिणीने किडनी दिल्याने भावाला मिळाले जीवदान 

बहिणीने किडनी दिल्याने भावाला मिळाले जीवदान 

Published On: Sep 30 2019 1:51AM | Last Updated: Sep 29 2019 11:38PM
दिंडोरी : वार्ताहर

आजच्या जमान्यात संपत्तीसाठी भाऊ भावाचा खून करतो तर काही वेळा बहीण-भावाच्या होत असलेल्या वादाच्या बातम्या वर्तमानपत्रात येत असतात. मात्र, दिंडोरी तालुक्यात आजारी भावाला वाचविण्यासाठी बहिणीने स्वत:ची किडनी देत त्याचे प्राण वाचवल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

पिंपळगाव बसवंत येथे राहणारा विकी  राजेंद्र गांगुर्डे (24) नेहमी आजारी असायचा. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासणी केली असता विकीची किडनी खराब झाल्याचे सांगितले. त्याला किडनी बसवल्याशिवाय पर्याय नव्हता.किडनी बसवण्यासाठी दवाखान्यांमध्ये चौकशी केल्यावर त्यासाठी 25 ते 30 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितल्याने कुटुंबीयांचा धीर खचला. एवढी मोठी रक्‍कम कोठून आणणार या विचाराने अख्खे गांगुर्डे कुटुंबीय हादरले. यावेळी दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे असणारी विकीची बहीण रूपाली समाधान सोनवणे (35) हिने स्वतःची  किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक घरांतील इतरही सदस्य किडनी देण्यास पुढे आले. मात्र, शारीरिक तपासणी केली असता फक्‍त बहीण रूपाली हिचा रक्‍तगट व इतर बाबी योग्य वाटत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रूपाली हिने लगेचच सासरकडील मंडळींना किडनी देण्याचा निर्णय सांगितला. यावेळी सासरच्या मंडळींनीही रूपालीचा उदारपणा पाहून  किडनी देण्यास सहमती दिली. थोड्याच दिवसांत रूपालीने स्वतःची किडनी देऊन भावाला उदारमनाने जीवदान दिले. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. रूपालीच्या या धाडसाचे तिचे माहेर व सासरकडील सर्व नातेवाइकांसह इतर नागरिकांनी कौतुक केले आहे. रूपाली सोनवणे हिच्या धाडसाची दखल घेऊन लखमापूरच्या सरपंच मंगल सोनवणे व माजी सरपंचा वर्षा सोनवणे यांनी रूपालीचा  सत्कार केला.