Tue, May 26, 2020 10:46होमपेज › Nashik › पवारांची देशहितविरोधी वक्‍तव्ये दुर्दैवी

पवारांची देशहितविरोधी वक्‍तव्ये दुर्दैवी

Published On: Sep 20 2019 1:45AM | Last Updated: Sep 19 2019 11:24PM
नाशिक : प्रतिनिधी

एकवेळ माझ्यावर, फडणवीस यांच्यावर टीका केली तर चालेल. परंतु, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत देशहितविरोधी बोलून पाकिस्तानला मदत होईल असे काही करू नका, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर काँग्रेसचा विरोध समजू शकतो. मात्र, शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडून ही अपेक्षा नाही. पवार जे बोलले ती त्यांची मर्जी असेल; पण महाराष्ट्रच नव्हे, संपूर्ण जगाला दहशतवाद्यांची फॅक्टरी कोठे आहे हे माहीत आहे, अशी टीका करीत मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुन्हा आणण्यासाठी जनादेश द्या, असे आवाहन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी नाशिक येथे गुरुवारी आयोजित विजयसंकल्प सभेत मोदी बोलत होते. त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात करीत प्रारंभीच नाशिककरांची मने जिंकून घेतली. नाशिकच्या धर्मभूमीला शतश: प्रणाम करीत असल्याचे सांगत मोदी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी ‘लोकप्रिय व ऊर्जावान मुख्यमंत्री’ असे गौरवोद‍्गार काढले. यात्रेहून परत आलेल्या व्यक्‍तीला नमस्कार केल्यास तिचे अर्धे पुण्य आपल्याला मिळते. त्या द‍ृष्टिकोनातून  मी येथे आलो आहे. मुख्यमंत्र्यांना कोट्यवधी जनतेने आशीर्वाद दिले आहेत. महाराष्ट्राच्या या आशीर्वादाचा काही अंश मी घेऊन जाणार असल्याचे मोदी म्हणालेे.

जो काम करील त्याला आशीर्वाद : एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी जनतेचे आशीर्वाद घ्यायला येथे आलो होतो. त्या सभेला मोठा जनसमुदाय उसळला होता. परंतु, आज नाशिक येथील जाहीर सभेने त्या सभेचेही रेकॉर्ड मोडले आहे. फडणवीस आणि त्यांच्या टीमला जनतेचा आशीर्वाद असल्याचा प्रत्ययच या गर्दीतून येत असल्याचे त्यांनी सांगितले. जो काम करील त्यालाच आशीर्वाद द्यायचा, हे महाराष्ट्राच्या जनतेने आता ठरवून टाकले आहे. राज्यात आजवर काही स्वार्थी राजकारण्यांनी राजकीय अस्थिरता निर्माण करून जनतेची दिशाभूल केली. विकास मुंबईपुरताच मर्यादित ठेवला. त्यामुळे ग्रामीण भाग ढोंगी राजकीय अस्थैर्याला बळी पडत राहिला. आता यापुढील काळात ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करावयाचे आहे. पुणे ही ज्ञानाची काशी समजली जाते. तेथे महात्मा फुलेंसारख्या महापुरुषांचा जन्म झाला. छत्रपती शिवरायांमुळे तर मनाला ऊर्जा प्राप्‍त होते. त्यांच्या या महाराष्ट्रात केवळ दोनच मुख्यमंत्री पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक व दुसरे देवेंद्र फडणवीस होय. फडणवीस यांनी स्थिर, प्रगती व विकसनशील सरकार चालवून दाखविले, असे ते म्हणाले.

विरोधकांची खिल्ली : मोदी म्हणाले, शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी या सरकारने पहिल्या 100 दिवसांत केली. त्यासाठी 1,500 कोटी रुपये केंद्राने राज्य सरकारला दिले. 50 कोटी पशूंचे लसीकरण करण्याचे काम हाती घेतले. निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व सुरू असल्याचे विरोधक म्हणतात. परंतु, जनावरे मतदान करतात का, असा प्रतिप्रश्‍न उपस्थित करीत मोदींनी विरोधकांची खिल्ली उडवली. वायुसेनेत लवकरच राफेल फायटर जेट दाखल होणार असून, तिन्ही दलांसाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.ताकदवान सरकार अनुभवले का? : भाजप सरकारने मागील पाच वर्षे न डगमगता काम करून दाखवले. याच ताकदीच्या जोरावर तुम्ही पुन्हा भाजप सरकारला सत्तेवर बसविले आणि मागील पाच वर्षांच्या तुलनेत ही ताकद आणखी बळकट केली. यामुळे आज ताकदवान सरकार उभे असून, सरकार काय करू शकते हे तुम्ही अनुभवले का, असा प्रश्‍न मोदी यांनी जनसमुदायाला केला. त्यावर जनतेने हात उंचावून ‘हो’ असा प्रतिसाद दिला. भाजप सरकारने देशात सुख-सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच देशाला मानसन्मान मिळवून दिल्याचे मोदी म्हणाले. मुद्रा लोन, उज्ज्वला गॅस योजना, स्वयंरोजगार, पाणीपुरवठा, गावागावांत वीज, पेन्शन योजना, जन-धन योजना, सर्वांना परवडणारी घरे यासह काही योजनांचा उल्लेख त्यांनी भाषणात केला.

अखंड भारताचे स्वप्न साकार : देशाच्या सुरक्षिततेला आम्ही प्राथमिकता देतो. देशापेक्षा कोणी मोठे नाही. आजवर जी आश्‍वासने दिली ती पूर्ण केली, असे सांगत मोदी यांनी जम्मू -काश्मीर व लडाखमधून हटविलेल्या 370 कलमाचा मुद्दा उपस्थित केला. सरकारच्या या निर्णयामुळे आता खर्‍या अर्थाने अखंड भारत साकारण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून, देशाने त्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. 130 कोटी जनतेचा या निर्णयाला पाठिंबा आहे. हिंसा, भ्रष्टाचार, दहशतवादातून बाहेर पडण्यासाठी 370 कलम हटविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

काश्मीरला स्वर्ग बनविण्याचा संकल्प

कालपर्यंत आपण काश्मीर आमचे आहे, असे म्हणत होतो. आता आपण या काश्मीरला घडविण्याबाबत बोलत आहोत. काश्मीरला पुन्हा एकदा स्वर्ग बनवायचे आहे. तेथील लोकांना बरोबर घेऊन विकास साधायचा आहे. या रक्‍तरंजित भूमीचा विकास करण्यासाठी तुम्ही सारे माझ्याबरोबर आहात का, असा प्रश्‍न मोदी यांनी लोकांना विचारला. त्यावर सर्वांनी होकार दर्शवीत मोदींना पाठिंबा दर्शवला. काश्मीरमधील अस्थिरता दूर करण्यासाठी काम करीत असताना सीमेपलीकडून दहशतवाद आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून अविश्‍वास पसरविला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली.

पगडीच्या प्रतिष्ठेसाठी आयुष्य खर्ची घालू

उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करताना त्यांच्या डोक्यावर पगडी घातली. मोदी यांनी उदयनराजे यांचा हात हातात घेऊन दोन्ही हात उंचावत जनसमुदायाला अभिवादन केले. या प्रसंगाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे यांनी माझ्या डोक्यावर घातलेली पगडी हा मी माझ्या आयुष्यातील बहुमूल्य क्षण मानतो. या पगडीची प्रतिष्ठा राखण्यासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालू, त्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावा.

युती तुटण्याचे संकेत?

राममंदिराबाबत काही वाचाळवीर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळी वक्‍तव्ये करीत आहेत. मात्र, देशात न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत अशा वाचाळवीरांनी संयम बाळगावा, असे आवाहन करताना पंतप्रधान मोदी यांनी एक प्रकारे शिवसेनेशी युती तुटणार असल्याचेच संकेत दिले, अशी चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राममंदिरावरून वेगवेगळी वक्‍तव्ये करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर नाशिकमधील सभेत मोदी यांनी शिवसेनेला सुनावले. त्यातून भाजपाचा स्वबळावर लढण्याचाच इरादा त्यांनी स्पष्ट केल्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा आहे.