Tue, Nov 19, 2019 14:07होमपेज › Nashik › सेना-भाजपातील तणाव निवळण्याची निफाडमधून नांदी

सेना-भाजपातील तणाव निवळण्याची निफाडमधून नांदी

Published On: Nov 04 2018 1:17AM | Last Updated: Nov 03 2018 11:38PMमनोज कावळे

शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या राज्यातल्या सत्ताधारी पक्षांमधला गेल्या दिवसांपासून सुरू असलेला कलगीतुरा हा राज्यातील जनता अनुभवत असताना आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नातून साकारत असलेल्या विविध विकासकामांच्या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे राज्यातील अत्यंत विश्‍वासू समजले जाणारे राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे पालकमंत्री गिरीश महाजन शनिवारी (दि.3) एकाच व्यासपीठावर आल्याने युतीबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार, त्याचा सामना भाजपा सरकारमधील दोन हेवीवेट नेते कसा करणार, याची उत्कंठा सगळ्यांनाच होती.

गेल्याच महिन्यात आमदार अनिल कदम यांच्या पुढाकाराने झालेल्या  बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावलेली हजेरी याच कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आमदार अनिल कदम यांच्या कामाची केलेली स्तुती आणि शनिवारी विविध विकासकामांच्या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्यात भाजपाचे चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी केवळ हजेरीच लावली नाही तर आमदार कदम यांच्यावर मुक्‍तहस्ते उधळलेली स्तुतिसुमने..! याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनीदेखील युतीबाबत केलेले सूचक वक्‍तव्य या सगळ्याच गोष्टींच्या निफाडच्या राजकीय पटलावर आता पुन्हा नव्याने चर्चा झडू लागल्या. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पाणीप्रश्‍नी पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार कदम यांच्यात आलेले वितुष्ट हे सर्वश्रुतच आहे. हाच धागा आपल्या प्रास्ताविकात पकडत आपल्यात आणि गिरीश महाजन यांच्यातले वाद आता मिटल्याचे कदमांनी जाहीर करीत मुळातच वाद नव्हते, काही लोकांनी दोघांमध्ये गैरसमज केल्याची मल्लीनाथी देखील केली. आता आमचं सगळं सुरळीत असल्याची कबुली कदमांनी दिल्यानंतर या विषयावर गप्प बसतील, ते महाजन कसले! त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यासमोरच शिवसेनेच्या आमदारांना निधी देताना भाजपा हात आखडता घेतो, हा दावा कदमांच्या तीनशे कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या निमित्ताने खोटा ठरला असून, माध्यमेच हा वाद निर्माण करीत असल्याचा आरोप केला. महाजन इतक्यावरच थांबले नाही तर आमदार कदम यांचा कार्यक्रम म्हटला तर तो भव्यदिव्यच असतो. याचा अनुभव आपण यापूर्वीच घेतल्याचे सांगत आमच्यात कुठलाही वाद नसल्याचा निर्वाळा महाजन यांनी दिला. महाजन यांच्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील कदम हे कार्यक्षम आमदार असून, एखाद्या कामाचा पाठपुरावा कसा करावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे असल्याचे सांगत कदम हे कधीही वैयक्‍तिक कामासाठी आपल्याला वा कोणत्याही मंत्र्याला भेटले नाही तर लोकांच्याच कामासाठी वा मतदारसंघातील सार्वजनिक कामासाठीच भेटत असल्याने मंत्रिमंडळात देखील ते एक लोकप्रिय व अभ्यासू आमदार म्हणून परिचित असल्याचे सांगितले. सरतेशेवटी या सरकारला उद्धव ठाकरे यांनी चांगला आशीर्वाद द्यावा, हे आवाहन करायला चंद्रकांत पाटील विसरले नाही.
या सर्व कार्यक्रमात उद्धव काय बोलतात याची उत्सुकता असल्याने उद्धव यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभीच सुप्रीम कोर्टाने फटाके वाजविण्यावर घातलेल्या बंदीवर बोलताना मला कायमच फटाके वाजवायची सवय आहे पण आता दिवाळीचे फटाके बाजूला ठेवून चांगले दिवे लावू, असे युतीबाबत सूचक विधान करीत सरकारच्या चांगल्या कामात मी कधीही आड आलो नाही, येणारही नाही असे सांगत जनतेच्या हितासाठी शिवसेना कोणालाही पाठिंबा देईल, असे सांगत भविष्यातील शिवसेनेची रणनिती मात्र गुलदस्त्यातच ठेवली. 

मागील काही महिन्यांपासून आमदार कदम यांच्या कार्यक्रमाला भाजपाच्या हेवीवेट नेत्यांनी लावलेली हजेरी, त्यात कदमांवर उधळलेली स्तुतिसुमने तर कदमांची भाजपाच्या हेवीवेट नेत्यांशी वाढत असलेली सलगी या सगळ्याच गोष्टी अचंबित करणार्‍या असून, राज्यातील शिवसेना-भाजपाचे ताणलेले संबंध बघता आजच्या काळोखात भविष्यातील युतीची बीजे हे निफाडच्याच भूमीवर रोवली जातात का, हे काळच ठरवेल! तूर्त आमदार कदमांनी दोन वेळा राज्यातील सेना-भाजपाच्या हेवीवेट नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणून दोन्ही पक्षांमध्ये वाढता तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र मात्र नक्‍कीच दिसत आहे.