Sun, Jun 07, 2020 10:29होमपेज › Nashik › ‘ईइएसएल’च्या एलईडीला शिवसेनेचा विरोध

‘ईइएसएल’च्या एलईडीला शिवसेनेचा विरोध

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:42AMनाशिक : प्रतिनिधी 

 केंद्रातील भाजपा सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरात एलईडी फिटिंगचे काम ‘ईइएसएल’ या कंपनीला देण्याचे फर्मान पत्राद्वारे सोडले आहे. ‘ईइएसएल’ ने देशात इतर ठिकाणी केलेले एलईडी फिटिंगचे काम फोल ठरले असून, नाशिकमध्ये यार कंपनीला पोसण्याचा घाट भाजपा घालत आहे. महापालिकेच्या स्वायत्तेवर घाला घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला. भाजपाने बहुमताच्या जोरावर या कंपनीला हा ठेका दिल्यास त्या विरोधात शिवसेना न्यायालयात जाईल, असा इशारा बोरस्ते यांनी शनिवारी (दि.3) पत्रकार परिषदेत दिला.

स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने ‘केपीएमजी’ एजन्सीकडून शहरात कोणाकडून एलईडी फिटिंग करायचे याचा डीपीआर तयार करून घेतला होता. इस्को कंपनीकडून शहरात 74 हजार एलईडी दिवे बसविण्यात येणार होते. त्यापैकी 11हजार एलईडी फिटिंगला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत एलईडी फिटिंग ही ‘ईइएसएल’ कंपनीकडून करावी, असे आदेश पत्राद्वारे दिले आहेत. त्यामुळे प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या एलईडी फिटिंगच्या ऑर्डर रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, अगोदरच डीपीआर तयार केला असताना पुन्हा नव्याने ‘ईइएसएल’कंपनीला डीपीआर तयार करण्यासाठी पैसे मोजण्याचे गौडबंगाल काय, असा सवाल बोरस्ते यांनी उपस्थित केला. ‘ईइसीएल’ ही केंद्र सरकारने तयार केलेली कंपनी आहे. एलईडी उत्पादनाशी या कंपनीचा काडीचाही संबंध नाही. ‘केपीएमजी’ एजन्सीने एलईडी फिटिंगसाठी ‘इस्को’ मॉडेलला प्राधान्य दिले होते. ‘इस्को’ शहरात मोफत एलईडी फिटिंग करणार होती. ऊर्जा बचतीवर या कंपनीला आर्थिक मोबदला दिला जाणार होता. असे असताना ‘ईइएसएल’ ला एलईडी फिटिंगचा ठेका देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एलईडीची योजना फोल ठरली तरी या कंपनीला आर्थिक मोबदला देणे महापालिकेला बंधनकारक राहणार आहे. महापालिकेसाठी हा तोट्याचा सौदा असून, ऊर्जा बचतीच्या नावाखाली ‘ईइएसएल’ कंपनीला पोसण्याचा भाजपाचा इरादा असल्याचा सणसणाटी आरोप त्यांनी केला. शिवसेना महासभेत या प्रस्तावास विरोध करणार आहे. भाजपाने हा प्रस्ताव रेटून नेल्यास शिवसेना त्या विरोधात जनहित याचिका दाखल करेल, असा रोखठोक इशारा बोरस्ते यांनी दिला.

‘ईइएसएल’ अनेकांना ठगले

‘ईइएसएल’ कंपनीने देशातील अनेक शहरांमध्ये केलेल्या एलईडी दिव्यांचा प्रकाश पडला नाही. मुंबईचा नेकलेस असलेला मरीन ड्राइव्ह, आंध्र पदेशातील नेल्लोर, उत्तर प्रदेशातील मेरठ या शहरामंध्ये या कंपनीने एलईडी फिटिंग केली होती. मात्र, या ठिकाणी एलईडीचा प्रकाश पडलाच नाही. असा वाईट अनुभव असताना भाजपा या ठेकेदाराला नाशिक महापालिकेवर थोपत असल्याचा, आरोप बोरस्ते यांनी केला.