Fri, Jun 05, 2020 14:51
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › सेनेत इनकमिंगमुळे निष्ठावान धास्तावले

सेनेत इनकमिंगमुळे निष्ठावान धास्तावले

Published On: Aug 25 2019 1:22AM | Last Updated: Aug 25 2019 1:22AM
नाशिक : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेने संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, त्यांच्यासोबत नेमके कोण-कोण प्रवेश करणार, याबाबतही उत्सुकता ताणली गेली आहे. दुसरीकडे सेनेत सुरू असलेल्या इनकमिंगमुळे निष्ठावान शिवसैनिक तसेच पदाधिकारी मात्र धास्तावले आहेत. 

राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजपा-सेनेत प्रवेश करीत आहेत. पक्षांतराचे हे लोण आता जिल्ह्यातही येऊन पोहोचले आहे. वार्‍याची बदललेली दिशा पाहून आमदार भुजबळ हेही सेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.  येत्या 27 किंवा 28 ऑगस्टला त्यांचा सेना प्रवेश निश्चित मानला जात आहे. भुजबळ यांनी सेनेत प्रवेश करावा म्हणून त्यांचे समर्थकच आग्रही आहेत. तुम्ही कोणत्याही पक्षात गेलात तरी आम्ही मनाने तुमच्याच सोबत असल्याचा विश्वासही या समर्थकांनी भुजबळ यांना दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर सोशल मीडियावर ‘हिशेब चुकविण्याची वेळ आली’ असल्याचा सूचक संदेशही फिरत आहे. या सार्‍या परिस्थितीवरून भुजबळ यांचा सेना प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यांच्यासोबत दिंडोरी-पेठ मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ, सटाणा मतदारसंघाच्या आमदार दीपिका चव्हाण यादेखील सेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. 

अर्थात या दोन्ही आमदारांनी वेळोवेळी सेना प्रवेशाचा इन्कारही केला आहे. या आमदारांबरोबरच आणखी कोण-कोण राष्ट्रवादीला रामराम करणार, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीत या सार्‍या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याआधीही कल्याणराव पाटील, धनराज महाले, निर्मला गावित, रामदास चारोस्कर यांनी शिवबंधन हाती बांधले आहे. निवडणुकीच्या तोंडावर सेनेत होत असलेली गर्दी पाहून निष्ठावान शिवसैनिक तसेच विद्यमान पदाधिकारी मात्र धास्तावले आहेत. प्रवेशाचे हे लोण जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळीही कायम राहिल्यास संधी हिरावली जाण्याची भीती त्यांना वाटत आहे. त्यातच भुजबळ यांची कार्यपद्धती पाहिल्यास पक्षात खरोखरच निष्ठावंताना न्याय मिळणार का, हाच खरा प्रश्न आहे. ज्यावेळी पक्ष अडचणीत होता, त्यावेळी आम्ही पक्षाप्रति निष्ठा बाळगली आणि आता पक्षाला चांगले दिवस आल्याचे पाहून बाहेरील व्यक्तींचा भरणा केला असल्याने संधी हिरावण्याची भीतीही निष्ठावंतांना वाटत आहे.