Fri, Jul 10, 2020 08:49होमपेज › Nashik › शेफाली भुजबळ, पवार, वाघेरे यांचे अर्ज बाद

शेफाली भुजबळ, पवार, वाघेरे यांचे अर्ज बाद

Published On: Apr 11 2019 2:08AM | Last Updated: Apr 11 2019 1:32AM
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक व दिंडोरी लोेकसभा मतदारसंघातील दाखल उमेदवारी अर्जांची बुधवारी (दि.10) छाननी प्रक्रिया शांततेत पार पडली. छाननीदरम्यान, शेफाली भुजबळ, प्रवीण पवार, हेमंत वाघेरे, वैभव महाले यांचे अर्ज बाद ठरले. दरम्यान, छाननीनंतर नाशिकमध्ये 23 तर दिंडोरीत 6 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. माघारीसाठी शुक्रवारी (दि.12) दुपारी 3 पर्यंत मुदत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11पासून अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडली. नाशिक मतदारसंघाची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांच्या दालनात पार पडली. छाननीमध्ये एकूण 30 पैकी 7 अर्ज बाद करण्यात आले. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार समीर भुजबळ यांचा अर्ज वैध ठरल्याने शेफाली भुजबळ यांचा अर्ज बाद करण्यात आला. तर अपक्ष उमेदवार शिवाजी वाघ, शत्रुघ्न झोंबाड व रंगा सोनवणे यांनी अनामत रक्कम न भरल्याने त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आला. मंगेश ढगेंनी अनामत रकमेसाठी धनादेश दिल्याने त्यांचाही अर्ज मांढरे यांनी बाद केला. भीमराव पांडवे यांचे नाव नांदेड येथील मतदारयादीत असून, तेथील मतदारयादीत नाव असल्याचे प्रतिज्ञापत्र अर्जासोबत न दिल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. तर विष्णू जाधव यांच्या दोन्ही अर्जांवर त्यांच्या स्वाक्षर्‍या नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला. 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची अर्ज छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर यांच्याकडे झाली. यावेळी भाजपाच्या डॉ. भारती पवार यांचा अर्ज वैध ठरल्याने त्यांचे पती व पक्षाकडून डमी अर्ज दाखल केलेले उमेदवार प्रवीण पवार यांचा अर्ज बाद करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले व माकपाचे जे. पी. गावित यांचे अर्ज वैध ठरल्याने अनुक्रमे वैभव महाले व हेमंत वाघेरे यांचे अर्ज निकाली काढले. तर गाझी ऐतजाद अहमद खान व शिवाजी मोरे यांनी नामनिर्देशन अर्जासोबत मतदारयादीची प्रत जोडली नसल्याने त्यांचा अर्ज अधिकार्‍यांनी बाद केला. तसेच भारतीय ट्रायबल पक्षाचे दत्तू बर्डे यांचा अर्ज वैध ठरल्याने बाबासाहेब बर्डे यांचा डमी अर्ज निकाली काढण्यात आला. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अनुक्रमे 23 व 9 उमेदवार बाकी आहेत. छाननी प्रक्रियेनंतर माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, उमेदवारांना शुक्रवारी (दि.12) दुपारी 3 पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. माघारीनंतर तत्काळ चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे माघारीनंतरच दोन्ही मतदारसंघांतील एकूण निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. 

प्रशासनाच्या डोकेदुखीत भर

छाननीनंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातून 23 उमेदवारांचे अर्ज बाकी आहे. माघारीसाठी दोन दिवस बाकी आहेत. परंतु, आतापासूनच प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कारण माघारीनंतर निवडणूक रिंगणात 16 उमेदवार राहिल्यास प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट लावावे लागणार आहेत. बॅलेट युनिटवर 15 उमेदवार तसेच नोटा अशी सोळाच बटणांची सुविधा असते. एक जरी उमेदवार वाढला तरी नवीन बॅलेट युनिट उपलब्ध करून द्यावे लागणार असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.