Fri, Jul 10, 2020 08:43होमपेज › Nashik › पिकविणार्‍याचे हित जपल्यास खाणारा जगेल : शरद पवार

पिकविणार्‍याचे हित जपल्यास खाणारा जगेल : शरद पवार

Published On: Apr 25 2019 1:45AM | Last Updated: Apr 24 2019 10:59PM
निफाड : वार्ताहर 

पाच वर्षांपूर्वी विकासाचे आश्‍वासन देऊन सत्तेवर बसलेल्या मोदी सरकारने शेतकरी, कष्टकर्‍यांची बोळवण केली आहे. त्यामुळे पिकविणार्‍यांचे हित जपले तरच खाणारा जगेल. शेतकरी, कष्टकरी,  बेरोजगारांचे हित जपण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निफाड येथील सभेत केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.

पवार म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकरी आधुनिकेतचा अंगीकार करतात. द्राक्ष, सोयाबिन, टोमॅटो, कांदा, डाळिंब उत्पादन घेतात. तसेच, परदेशात सर्वाधिक द्राक्ष निर्यात करणारे महाराष्ट्र राज्य असून त्यात नाशिकचा मोठा वाटा असतो. मी परदेशात गेल्यावर आवर्जून फळ बाजारपेठेत जातो. तेेथे नाशिकच्या द्राक्षाला असलेल्या मागणीने शेतकर्‍यांचा अभिमान वाटतो. आमच्या सरकारच्या काळात कांद्यावरील  निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भाजपाच्या खासदारांनी सभागृहात कांद्याच्या माळा घालून निदर्शने केली होती. त्याकडे दुर्लक्ष करत आम्ही शेतकरी हित जपले होते. शेती, अर्थव्यवस्था संकटात आली तर देशाची  अर्थव्यवस्थाही संकटात येते. त्यामुळे ठोस निर्णय घेत 70 हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता.

गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी यांनी सत्तेत असताना अनेक घोषणा केल्या. देशात शेतीबाबत कोणतेही ठोस काम शेतकर्‍यांच्या हिताचे केले नाही. 2017 ते 2019  या काळात 11 हजार 998 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. शेतीबाबत धोरणे नसल्याने शेती उत्पादन घसरले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणी वाढल्या.

कृष्णा डोंगरे यांनी घेतली भेट

येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी शरद पवार यांची भेट घेत आपली कैफियत मांडली. जोपर्यंत मोदी सरकार जात नाही आणि शेतमालाला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत अर्धनग्न राहण्याचा संकल्प डोंगरे यांनी केला आहे. याप्रसंगी जयंत पाटील यांनी डोंगरे यांना सांगितले की, 23 मे रोजी तुला मी शर्ट पाठवून देईल.