Tue, Jun 02, 2020 12:27होमपेज › Nashik › महिला सक्षमीकरणासाठी शांतिगिरी महाराजांचे मोलाचे योगदान : छत्रपती संभाजीराज

महिला सक्षमीकरणासाठी शांतिगिरी महाराजांचे मोलाचे योगदान : छत्रपती संभाजीराज

Published On: Aug 24 2019 1:28AM | Last Updated: Aug 24 2019 1:28AM
नाशिक : प्रतिनिधी

निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी समाजाला योग्य दिशा देण्यासाठी सर्वांगाने  प्रयत्न केले असून, आजही अखंडपणे सुरू आहेत. महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहेत, असे गौरवोद‍्गार खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी काढले. 

ओझर येथील आश्रमात जगद्माउली म्हाळसामाता यांची पुण्यतिथी व ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन केले होते. सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, आध्यात्मिक मार्गदर्शनाबरोबरच राजकारणाच्या शुद्धीकरणाचे कार्य देखील शांतिगिरीजी महाराज करीत आहेत. त्यांचे  हे  कार्य अध्यात्माबरोबरच  सर्वांर्थाने समाजहिताचे आहे. छत्रपती घराण्यावर बाबाजींचा सदैव आशीर्वाद असावा असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले तर दुग्धविकास व  पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, देव, देश, धर्मासाठी महाराजांचे मोठे योगदान असून महिला सक्षमीकरणाबरोबरच  आश्रमाच्या वतीने वेळोवेळी समाजहितासाठी राबविले जात असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत.  

यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनीही बाबाजींच्या आणि राजेंच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार अपूर्व हिरे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे,  शिवाजी सहाणे, माजी आमदार मंदाकिनी कदम, पिंपळगावच्या सरपंच अलका बनकर, जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका वैशाली कदम, दामोदर मानकर, सुनील आडके, शिवाजी गांगुर्डे, पंडित भुतेकर आदी उपस्थित होते. 

दरम्यान, कार्यक्रमाचा प्रारंभ बाबाजींच्या पालखी मिरवणुकीने करण्यात आला. उपास्थित मान्यवरांचे स्वागत -पूजन आश्रम सेवा समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरजू महिलांना वस्त्रदान करण्यात आले. तसेच, पूरग्रस्तांना साहित्य आणि प्रत्यक्ष मदतीसाठी भक्‍त परिवाराची वाहने कोल्हापूरला रवाना करण्यात आलीत. याप्रसंगी तोलाजी शिंदे आणि सुरेश जाधव यांनी पंचवीस हजाराचा तर राजेश शिंदे, बापूशेठ पिंगळे यांनी पस्तीस हजाराचा धनादेश छत्रपती संभाजीराजे  यांच्याकडे सुपुर्द केला. प्रास्ताविक विष्णू महाराज यांनी तर उपस्थितांचे आभार भक्‍त परिवारातील सदस्य या नात्याने खासदार हेमंत गोडसे यांनी मानले. 

सोहळा यशस्वीतेसाठी आश्रम विश्वस्त, जय बाबाजी म्हाळसामाता महिला मंडळ यांच्यासह छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश युवा अध्यक्ष शिवा तेलंग, प्रदेश युवाचे अध्यक्ष प्रा. उमेश शिंदे, शिवाजी मोरे, विजय खर्जुल, संतोष माळोदे, नितीन सातपुते, नवनाथ शिंदे, सागर पवार, नितीन दातीर, अविनाश सोनवणे, नितीन पाटील, पूजा धुमाळ, वंदना कोलते, मनोरमा पाटील, किरण बोरसे, थोरात आदींनी प्रयत्न केले.